नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शरदराव किटकरू यांचा ७३ वा जन्मसोहळा त्यांच्या कुटुंबियांनी नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही उपस्थित होते. श्री. किटकरू यांच्या पत्नी, मुली आणि जावई सनातन संस्थेशी जोडलेले असल्याने त्यांनी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे पुत्र पू. हेमंत कसरेकर उपाख्य पू. नंदूदादा कसरेकर यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. व्यासपिठावर प.पू. सरसंघचालक मोहन भागवत, पू. नंदूदादा कसरेकर, श्री. शरद किटकरू आणि त्यांच्या पत्नी सौ. उषा किटकरू विराजमान होते.
सनातन संस्थेच्या वतीने प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत अन् शरद किटकरू यांचा सत्कार !
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने श्री. शरद किटकरू यांचा सत्कार करण्यात आला, तसेच किटकरू यांच्या कुटुंबियांनी त्यांना दिव्यांनी ओवाळून त्यांचे औक्षण केले. सनातन संस्थेच्या वतीनेही श्री. अभय वर्तक यांनी श्री. किटकरू यांचा सत्कार केला. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना सनातनचे ग्रंथ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. पू. नंदूदादा कसरेकर यांनीही त्यांचा सत्कार केला.
सरसंघचालकांची भेट एक दैवी नियोजन !
या कार्यक्रमाच्या वेळी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा साधेपणा, सर्वांना प्रेमाने भेटणे, लहान मुलांची थांबून चौकशी करणे, इतरांची सोय पहाणे, इतरांना सन्मान देणे हे सर्वच मनाला भावणारे होते. कार्यक्रमानंतर त्यांच्याशी १५ मिनिटे संवाद साधण्याची संधी मिळाली. यामुळे पुष्कळ कृतज्ञता वाटली.
माझ्या समवेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर हेही होते. तेही त्यांच्या तरुणपणी संघ स्वयंसेवक होते. त्या वेळी स्वतः मोहन भागवत यांनी त्यांना लाठीकाठी आणि अन्य युद्धप्रकार शिकवले होते. श्री. श्रीकांत पिसोळकर यांचा इतका जुना परिचय प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लक्षात ठेवला, याचे आश्चर्य वाटले !
भोजनाच्या वेळी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ‘त्यांच्या या भेटीतून सनातन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जवळीक होणे, हे एक दैवी नियोजन होते’, असे जाणवले. ‘सनातन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही संस्था हिंदु राष्ट्राच्या एकाच ध्येयाने प्रयत्न करत आहेत. ते ध्येय लवकर पूर्ण होण्यासाठी दोन्ही संस्थांमधील संवाद वृद्धींगत होईल तेवढे पोषक ठरेल. तेच ईश्वराचे प्रयोजन आहे’, असे या भेटीतून माझ्या लक्षात आले. – श्री. अभय वर्तक
सरसंघचालकांकडून रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे कांदळी (नारायणगाव) येथील समाधीस्थळ येथे भेट देण्याची इच्छा व्यक्त !
कार्यक्रमानंतर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सरसंघचालकांशी वार्तालाप केला. या वेळी सरसंघचालकांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘दोन संघटनांमध्ये संवाद निर्माण होण्यासाठी नियमित भेटणे आणि चर्चा करणे अतिशय महत्त्वाचे असते.’’ या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी जाणून घेतले. या वेळी त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी (नारायणगाव) येथे असलेल्या समाधीस्थळी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी पू. नंदूदादा यांनी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. गोळवलकरगुरुजी यांची भेट झाल्याची आठवण आवर्जून सांगितली.
– श्री. अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
किटकरू कुटुंबाचे वैशिष्ट्य !
किटकरू कुटुंब म्हणजे सनातन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या सुरेख संगमाचे ज्वलंत उदाहरण आहे. किटकरूकाकांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील दायित्व आणि ज्येष्ठत्व मोठे आहे. श्री. किटकरू यांनी तरुणपणी संघकार्यासाठी मोठा त्याग केलेला आहे. किटकरूकाका राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहसंघचालक आणि नंतर संघचालक म्हणून कार्यरत होते. संघकार्य वृद्धींगत होण्याविषयीची तीव्र तळमळ त्यांच्यात होती. श्री. किटकरू यांचा संघकार्यात पूर्णतः झोकून देण्यात त्यांची पत्नी सौ. उषा किटकरू यांचाही मोठा त्याग केला आहे. केवळ संघाचेच नव्हे, तर वनवासी समाजाच्या कल्याणासाठी नागपूर शहर सोडून त्यांनी अतिशय दुर्गम भागात प्रवास केला. वनवासी कल्याण आश्रमाचे सचिव म्हणून दायित्व बघितले.
नागपूर येथे सनातन संस्थेच्या कार्यास प्रारंभ झाला, तेव्हाही काकांनी पुष्कळ साहाय्य केले. त्यांनी सनातन संस्थेचे कार्यही तितक्याच आपुलकीने केले. कोणत्याही संघटनेत कार्य करत असतांना इतर संघटनांना आपले समजणे यासाठी स्वतःच्या मनाचा मोठेपणा असावा लागतो. तो काकांमध्ये आहे. – श्री. अभय वर्तक