२१ ते २३ नोव्हेंबर या काळात पू. स्वामी स्वरूपानंद यांची व्याख्यानमाला ! – स्वामी दत्तराजानंद

पत्रकार परिषदेत डावीकडून स्वामी दत्तराजानंद आणि डॉ. वासुदेव देशींगकर

कोल्हापूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – कोल्हापूर येथील चिन्मय सेवा समितीच्या वतीने चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते पू. स्वामी स्वरूपानंद यांची २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत व्याख्यानमाला होत आहे. ही व्याख्यानमाला प्रतिदिन सायंकाळी ६.३० ते रात्री ८ या वेळेत ‘सुखाचे सार-गीतेचे ज्ञान’ या विषयावर प्रतिभानगर येथील चिन्मय पुष्पांजली येथे होईल. हे या व्याख्यानमालेचे ७ वे वर्ष असून याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चिन्मय मिशन, कोल्हापूरचे प्रभारी स्वामी दत्तराजानंद यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव देशिंगकर आणि ‘चिन्मय सेवा समिती’चे अध्यक्ष श्री. हसमुखभाई शहा उपस्थित होते.

स्वामी दत्तराजानंद म्हणाले, ‘‘पू. स्वामी स्वरूपानंद हे पू. गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांचे शिष्य असून त्यांनी वेदांत प्रशिक्षण घेतले आहे. चिन्मय मिशन ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, मध्यपूर्व आशिया, पूर्वोत्तर देश, आफ्रिका या देशांचे ते भूतपूर्व प्रमुख आहेत. चिन्मय विश्वविद्यापिठाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. ते जगभर भगवत् गीता, उपनिषदे, वेदांत, भारतीय संस्कृती, व्यवस्थापन अशा विविध विषयांवर व्याख्याने देतात.’’

२१ नोव्हेंबरला ‘चिन्मय पुष्पांजली’ या नूतन वास्तूचा वास्तूशांती आणि उद्घाटन सोहळा !

या प्रसंगी डॉ. वासुदेव देशिंगकर म्हणाले, ‘‘चिन्मय मिशनच्या देश-विदेशात २०० हून अधिक शाखा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशनला ‘पद्मविभूषण’ देऊन गौरवले आहे. या वास्तूसाठी ७ कोटी रुपये व्यय आला असून हे सर्व भाविकांकडून मिळणार्‍या अर्पणातून उभे केले आहे. २१ नोव्हेंबरला ‘चिन्मय पुष्पांजली’ या नूतन वास्तूचा वास्तूशांती आणि उद्घाटन सोहळा पू. स्वामी स्वरूपानंदजी यांच्या हस्ते होत आहे. सकाळी ६.३० ते ११.३० रुद्र होम, वास्तूशांती पूजा, शिवपार्वती मूर्ती स्थापना, दुपारी ११.३० ते १२.३० स्वामीजींचे आशीर्वचन आणि नंतर महाप्रसाद होईल. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा.’’