लाकडी साहित्य आणि फर्निचर यांमुळे आग लागली
मुंबई – येथील वांद्रे-कुर्ला मेट्रो भूमीगत स्थानकात १५ नोव्हेंबर या दिवशी १ वाजता आग लागली. वांद्रे ते आरे वसाहत हा पहिला टप्पा नुकताच चालू करण्यात आला होता. भूमीगत मेट्रो स्थानकातील तळघरात ठेवलेले लाकडी साहित्य आणि फर्निचर यांना ही आग लागली. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोळ उठले होते. त्यामुळे मेट्रो सेवा थांबवण्यात आली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आगीच्या घटनेमुळे प्रवासी भयभीत झाले होते. त्यांना तेथून बाहेर काढण्यात आले.
भूमीच्या ४० ते ५० फूट खाली आग लागली होती. तेथे मेट्रो स्थानकाचे कामही चालू होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीशमनदलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले आहेत. दुपारी अडीच वाजता आग नियंत्रणात आली. या आगीत वित्तहानी झाली आहे; पण जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिकेने दिली.