‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा करण्यात आला संकल्प !

  • वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

  • अधिवेशनात उत्तरप्रदेश, बिहार, मणीपूर, आसाम, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया येथील ५० हून अधिक संघटनांचे १५५ धर्माभिमानी सहभागी !

आचार्य डॉ. कामेश्वर उपाध्याय

वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदुत्वनिष्ठ उपक्रमांना चालना देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेले ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात पार पडले. या अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी ‘उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या परिसरातील अन्य हिंदु संघटनांशी संपर्क करणे, मंदिर संपर्क मोहीम राबवण्ो आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांना बळकट करणे’, यांविषयी नियोजन करण्यात आले. या अधिवेशनाला वाराणसीतील भारत सेवाश्रम संघाचे स्वामी ब्रह्मयानंद, वाराणसी येथील ‘भारत माता मिशन’चे पीठाधीश्वर स्वामी विवेक चैतन्य, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती, तसेच वाराणसी व्यापारी मंडळाचे श्री. अजितसिंह बग्गा, ‘प्राच्यम्’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’चे श्री. प्रवीण चतुर्वेदी हेही उपस्थित होते. या वेळी उत्तरप्रदेश, बिहार, मणीपूर, आसाम, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया येथील ५० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ते, संत, मंदिर विश्वस्त, उद्योगपती, पत्रकार आणि संपादक यांच्यासह १५५ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी केलेले मार्गदर्शन

१. आचार्य डॉ. कामेश्वर उपाध्याय, महासचिव, अखिल भारतीय विद्वत परिषद, वाराणसी

भारतवर्षातील सनातन धर्माच्या रक्षणासाठी संपूर्ण वसुंधरावर (पृथ्वीवर) जेथे आवश्यक असेल, तेथे बग्लामुखीदेवीची पूजा, रुद्र आणि हवन कार्य चालू करावे. आचार्य अरविंद घोष म्हणाले होते, ‘वर्ष २०२० पासून भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करील आणि त्याचे नेतृत्व १ सहस्र वर्षे चालू राहील, ही देवाची आज्ञा आहे.’ भारतवर्षात जर सनातन राष्ट्राची स्थापना झाली, तर १५ ते २० देशात हिंदु राष्ट्र आपोआप स्थापन होईल आणि ते कुणीही रोखू शकणार नाही. आज आपल्याला राष्ट्र उभारणीच्या दिशेने महर्षि वसिष्ठांची आवश्यकता आहे. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, प्रभु श्रीराम नसलेले राष्ट्र असू शकत नाही. जोपर्यंत या देशात अग्निहोत्र होत नाही, तोपर्यंत देशाचे रक्षण करण्यासाठी कोणतीही शक्ती रहाणार नाही.

२. श्री. शंकर खरेल, नेपाळ

नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आल्यापासून लोकशाहीच्या आधारावर तेथील साम्यवादी पक्षांकडून हिंदूंमध्ये फूट पाडली जात आहे. भारताला लागून असलेल्या नेपाळी भागात ‘भारतीय आणि नेपाळी जनता यांच्यात परस्पर संबंध आहेत’, असे सांगून त्यांनी अशा लोकांना परस्पर प्रयत्न करून वैमनस्य कमी करण्याचे आवाहन केले. कोणत्याही राष्ट्रीय सीमांविना भारत आणि नेपाळ यांना ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व संघटनांना केले.

३. श्री. प्रियानंद शर्मा, मणीपूर

मणीपूरमधून सनातन धर्माचे उच्चाटन होत आहे. भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मणीपूरमधील हिंदूंसाठी आवाज उठवावा.

४. श्री. अजय सिंह, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड हिंदू फेडरेशन

आपण केवळ भारतातच नव्हे, तर हिंदू जगासाठी हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. अनेक देशांमध्ये सनातन धर्म स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे. भारतात हिंदु राष्ट्र येताच अनेक देश हिंदु राष्ट्र ही संकल्पना स्वीकारतील.

५. श्री. प्रवीण चतुर्वेदी, ‘प्राच्यम्’ ओटीटी प्लॅटफॉर्म

आपण तरुणांना सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु संस्कृती आणि परंपरा यांच्याद्वारे जोडले पाहिजे, तरच आपण भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवू शकू.

६. श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

भारतातील विकास कामे रोखण्यामागे आणि धर्मांतर करण्यामागे ‘डीप स्टेट’ आहे. ‘डीप स्टेट’मध्ये चर्चचा सहभाग मोठा आहे. (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेच्या द्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात.)