मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १५ नोव्हेंबर या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध गंभीर समस्यांचा उल्लेख करत त्यावर विविध उपाययोजना मांडल्या आहेत. आनंदी, ज्ञानी आणि बलवान महाराष्ट्र घडवण्याची संकल्पना मनसेच्या घोषणापत्रात आहे.
मनसेच्या घोषणापत्रातील घोषणा पुढीलप्रमाणे आहेत. मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर विविध उपाययोजना काढतांना मोकळ्या मैदानाच्या खाली भुयारी पार्किंगची व्यवस्था करण्याची कल्पना आहे. राज्यातील शिधावाटपाची (रेशनची) दुकाने बंद करून त्याऐवजी अनुदानाची रक्कम कुटुंबातील महिलेच्या खात्यात जमा करावी. प्रत्येक माणसाला पुरेल इतके पाणी मिळावे, यासाठी पावसाच्या पाण्याचे सुनियोजन करण्याच्या १५ कार्यक्रमांची घोषणा आहे. महाराष्ट्र घुसखोरमुक्त होण्यासाठीच्या विविध उपाययोजना आहेत. मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी मनसेकडून विशेष कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यामध्ये रूढ इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी सोपे मराठी शब्द सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची कल्पना आहे. गडदुर्ग आणि अन्य ऐतिहासिक वास्तू यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची कल्पना आहे. महाराष्ट्रासाठी स्वतंत्र रेल्वेमहामंडळाची कल्पनाही आहे. यांसह शिक्षण, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, विजेची उपलब्धता, रोजगाराच्या संधी यांविषयीच्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना दिल्या आहेत.