कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला स्थिर राहून सामोरे जाणारे देवद, पनवेल येथील कै. प्रभाकर भालचंद्र प्रभुदेसाई !

‘२७.११.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील प्रभाकर भालचंद्र प्रभुदेसाई यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. १५.११.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. योगेश प्रभुदेसाई आणि सून सौ. राधा प्रभुदेसाई यांना त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

श्री. प्रभाकर प्रभुदेसाई

१. श्री. योगेश प्रभुदेसाई (कै. प्रभाकर प्रभुदेसाई यांचा मुलगा), देवद, पनवेल 

श्री. योगेश प्रभुदेसाई

१ अ. ‘बाबांचा अंतिम क्षण जवळ आला आहे’, असे वाटणे आणि त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् स्वामी स्वरूपानंद (पावस) यांच्याकडे जायचे आहे’, असे सांगणे : ‘२७.११.२०२३ या दिवशी सकाळी ११ वाजता मला वाटले, ‘आता बाबांचा अंतिम क्षण जवळ आला आहे. त्या वेळी मला गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सुचवले, ‘बाबांच्या डोक्यावरून हात फिरव.’ मी तसे केले आणि त्यांच्या कानाजवळ जाऊन त्यांना सांगितले, ‘‘आता तुम्हाला प.पू. गुरुदेव आणि स्वामी स्वरूपानंद (पावस) यांच्याकडे जायचे आहे.’’

१ आ. त्यानंतर ५ मिनिटांतच बाबांचे निधन झाले. ‘बाबांचा शरिराच्या वरील भागातून प्राण गेला आणि अंतिम क्षणी त्यांच्या समवेत सद्गुरूंचे नाम होते’, असे मला जाणवले.

२. सौ. राधा योगेश प्रभुदेसाई (कै. प्रभाकर प्रभुदेसाई यांची सून), देवद, पनवेल 

२ अ. निधनापूर्वी

सौ. राधा प्रभुदेसाई

२ अ १. सासर्‍यांना (बाबांना) कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर ‘गुरुदेवच साहाय्य करणार्‍या व्यक्तींच्या माध्यमातून उपचारांविषयी सांगत आहेत’, असे जाणवणे : ‘बाबांना (सासर्‍यांना) कर्करोग झाला आहे’, असे निदान झाल्यावर त्यांच्यावर उपचार चालू झाले. तेव्हा ‘गुरुदेवच आम्हाला साहाय्य करणार्‍या व्यक्तीच्या माध्यमातून ‘बाबांवर उपचार कसे करायचे ? कोणत्या चाचण्या कुठे करायच्या ?’ याविषयी सांगत होते’, असे मला जाणवले.

२ अ २. एकदा पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत) बाबांना भेटण्यासाठी आमच्या घरी आल्या होत्या. त्या वेळी बाबांनी त्यांना सांगितले, ‘‘मला काही झाले, तर माझे अंतिम विधी देवद आश्रमाजवळील स्मशानभूमीत करावेत.’’

२ अ ३. ‘प्रभुदेसाईकाकांना पाहून चांगले वाटते’, असे साधकांनी सांगणे आणि ‘गुरुदेव सूक्ष्मातून सतत बाबांच्या समवेत आहेत’, असे बाबांच्या कुटुंबियांना जाणवणे अन् घरातील वातावरण चांगले असणे : बाबांची प्रकृती बरी नव्हती. साधक बाबांना भेटून ‘काकांना इतका गंभीर आजार आहे’, असे त्यांच्याकडे पाहून वाटत नाही. काका उत्साही वाटतात’, असे आम्हाला सांगत असत. तेव्हा ‘गुरुदेव सूक्ष्मातून सतत बाबांच्या समवेत आहेत. इतका मोठा आजार होऊनही बाबा स्थिर आहेत’, असे आम्हा कुटुंबियांना जाणवत असे. त्यामुळे घरातील वातावरणही चांगले होते.

२ अ ४. माझ्या सासूबाई (श्रीमती उल्का प्रभाकर प्रभुदेसाई, वय ७४ वर्षे) नामजप करत असत. ‘या कठीण प्रसंगातही त्या स्थिर आहेत’, हे पाहून घरी आलेले सर्व नातेवाईक आश्चर्य व्यक्त करत असत.

२ अ ५. ‘अंतिम समयी बाबांच्या जवळ त्यांचा मुलगा असणे’, ही देवाची मोठी कृपा असणे : २७.११.२०२३ या दिवशी रुग्णालयात बाबांची स्थिती गंभीर होती. ते अतीदक्षता विभागात होते. मी रुग्णालयात जात होते. तेव्हा अकस्मात् माझ्या मनात विचार आले, ‘बाबांजवळ गुरुदेव आहेत. त्यामुळे तेथे चैतन्य आहे. गुरुदेवांनी बाबांच्या डोक्यावर हात ठेवला आहे.’ ‘त्या वेळी केवळ श्री. योगेश बाबांच्या जवळ होते’, हे मला ठाऊक नव्हते. मी रुग्णालयात जात असतांनाच योगेश यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘बाबांनी या जगाचा निरोप घेतला.’’ ‘बाबांच्या अंतिम समयी त्यांच्या जवळ योगेश होते’, ही गुरुदेवांची किती मोठी कृपा आहे !

पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी बाबांच्या संदर्भात काढलेले उद्गार !

पू. (सौ.) अश्विनी पवार

मी पू. (सौ.) अश्विनीताईंना विचारले, ‘‘बाबांना घरातील एखाद्या सदस्याविषयी ओढ असली, तर ते त्यांच्यात अडकतील का ?’’ तेव्हा पू. ताईंनी सांगितले, ‘‘ते साधक होते. तो जीव सात्त्विक होता. त्यांचा त्यागही पुष्कळ होता. त्यांची साधना आहे. ते कशातही अडकणार नाहीत आणि ते साधनेत पुढे जातील’’

(बाबा साधनेत येण्यापूर्वी त्यांच्यावर स्वामी स्वरूपानंद आणि प.पू. गगनगिरी महाराज यांची कृपादृष्टी होती.)

– सौ. राधा योगेश प्रभुदेसाई

२ आ. निधनानंतर 

२ आ १. बाबांचे अंतिम संस्कार देवद आश्रमाजवळील स्मशानभूमीत झाले. त्या वेळी आम्हाला साधकांचे साहाय्य लाभले. आम्हाला गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता वाटत होती.

२ आ २. आमच्या कुटुंबातील सर्वच नातेवाइकांनी आम्हाला पुष्कळ साहाय्य केले आणि आधार दिला. हे आमचे मोठे भाग्यच आहे. ‘गुरुदेवच त्यांच्या माध्यमातून साहाय्य करत आहेत’, असे आम्हाला जाणवले.

३. बाबांच्या संदर्भात सासूबाईंना स्वप्नात दिसलेले दृश्य 

बाबांच्या निधनानंतर एकदा सासूबाईंना स्वप्नात दिसले, ‘एक नदी आहे. नदीच्या तिरावर त्या, त्यांची मुलगी (अधिवक्त्या तनुजा प्रभुदेसाई) आणि काही लोक उभे आहेत. बाबा नदीच्या पलीकडच्या तिरावर उभे होते. त्यांच्या समवेत पांढर्‍या रंगाचा झब्बा घातलेले प.पू. गुरुदेव होते. बाबा प.पू. गुरुदेवांच्या समवेत पुढे पुढे गेले.’

४. पू. अश्विनीताई आम्हाला नेहमी सांगत असत, ‘‘गुरुदेवांचे तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे. ते सदैव तुमच्या समवेत आहेत.’’ आम्हाला त्याची प्रचीती आली. अंतिम क्षणी गुरु किंवा देव यांचे स्मरण केले, तर चांगली गती प्राप्त होते. हे सर्व केवळ अन् केवळ गुरुकृपेने झाले.

५. प्रभुदेसाई कुटुंबातील सदस्य पुष्कळ प्रेमळ आहेत. ते आम्हाला प्रत्येक वेळी समजून घेतात. असे प्रेमळ कुटुंब मी कुठे पाहिले नाही. ‘असे कुटुंब मला मिळाले’, हीसुद्धा गुरुकृपाच आहे’, असे मला वाटते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ६.११.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक