पुणे – विहित कर्मे न सोडता वैराग्यवृत्ती अंत:करणात असली पाहिजे, ही समर्थ रामदासस्वामी यांची शिकवण आहे. केवळ जपाची माळ ओढू नका, तर वेळप्रसंगी नाठाळाचे माथी काठी मारावी, असा क्रांतीकारी विचारही त्यांनी दिला आहे. समर्थांनी चारित्र्य निर्मितीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्यांनी शिकवलेली २६ सूत्रे आणि मार्गदर्शक तत्त्वे सामान्यांच्या मनात उतरवण्याचे कार्य घडले पाहिजे, असे प्रतिपादन ‘दासबोध सखोल अभ्यास’ उपक्रमाचे संचालक डॉ. विजय लाड यांनी केले. ते ‘सह्याद्री शिखर श्रीरामदास स्वामी पादुका संस्थान ट्रस्ट, महाबळेश्वर मठा’कडून माधव किल्लेदार लिखित ‘समर्थ नेतृत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. लाड यांच्या हस्ते करण्यात आले. सदाशिव पेठेतील ‘वेद शास्त्रोत्तेजक सभा’ येथे हा कार्यक्रम पार पडला. डॉ. लाड पुढे म्हणाले, ‘‘समर्थ नेतृत्व म्हणजे स्वत:च्या अस्तित्वाचे स्मरण ठेवणे अशी शिकवणही पुस्तकातून देण्यात आली आहे.’’
समर्थांच्या २६ सूत्रांचा गुढार्थ सहज, सोप्या शब्दांत गोष्टी रूपाने ‘समर्थ नेतृत्व’ या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवण्यात आला आहे. प्रा. डॉ. शिरीष लिमये म्हणाले, ‘‘समर्थ नेतृत्व करतांना चारित्र्यसंपन्न असणे अतिशय आवश्यक आहे. इंद्रियांवर मनाचा आणि मनावर बुद्धीचा लगाम असणारी व्यक्तीच समर्थ नेतृत्व करू शकते, अशी शिकवण समर्थांनी दिली आहे.’’ लेखक श्रीकांत किल्लेदार म्हणाले, ‘‘समर्थ रामदासस्वामींच्या साहित्याचा अभ्यास करतांना नेतृत्व करणारी व्यक्तीच नेतृत्व करण्यास सक्षम व्यक्ती घडवू शकते, असे लक्षात आले. त्यातूनच ‘समर्थ नेतृत्व’ या पुस्तकाची निर्मिती झाली.’’