पुरी येथील जगन्नाथ मंदिर ट्रस्ट आणि गोवर्धन पीठ यांची मागणी
(इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस)
पुरी (ओडिशा) – इस्कॉनने ९ नोव्हेंबर या दिवशी अमेरिकेच्या ह्युस्टन येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचे आयोजन केले होते. या रथयात्रेवरून मोठा वाद झाला. या पार्श्वभूमीवर पुरी येथील जगन्नाथ मंदिर ट्रस्ट आणि गोवर्धन पीठ यांनी भारतात इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण ?
१. इस्कॉनने ओडिशा सरकार आणि पुरीचे गजपती महाराज यांना ‘नियोजित वेळेसह इतर वेळी रथयात्रा आयोजित केली जाणार नाही’, असे आश्वासन दिले होते. असे असतांना अमेरिकेतील ह्युस्टन येथे इस्कॉनने भगवान जगन्नाथाची रथयात्रा आयोजित केली होती. या यात्रेत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या नव्हत्या. इस्कॉनच्या ‘फेस्टिव्हल ऑफ ब्लिस’मध्ये हा प्रकार घडला. यानंतर ओडिशा सरकार आणि भाविक यांनी या कार्यक्रमावर टीका केली आहे.
२. पुरीतील गोवर्धन पीठाचे प्रवक्ते मातृप्रसाद मिश्रा म्हणाले की, हा कार्यक्रम धर्मविरोधी आहे, त्यामुळे इस्कॉनवर भारतात बंदी घालावी. ह्युस्टनमधील इस्कॉनने रथयात्रा आयोजित करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे.
३. ओडिशाचे कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन म्हणाले की, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन या प्रकरणी निर्णय घेईल; मात्र मंदिर जो निर्णय घेईल, त्याला राज्य सरकार पाठिंबा देईल.
४. ह्युस्टन इस्कॉनच्या वतीने संकेतस्थळावर निवेदन देण्यात आले की, मंदिराने यापूर्वी मूर्तींसह रथयात्रा काढण्याचा विचार केला होता; मात्र स्थानिकांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त केल्याने हा निर्णय पालटण्यात आला. उत्सवासाठी येणार्या भाविकांना भगवान जगन्नाथाचे दर्शन घ्यायचे आहे. त्याचबरोबर परंपरेचा आदर करणेही आवश्यक आहे. इस्कॉन आणि पुरी येथील मंदिराचे अधिकारी यांच्यामध्ये पुढील महिन्यात भारतात बैठक होणार असून जे काही एकमत होईल त्यानुसार काम केले जाईल. पारंपर आणि भक्तांच्या इच्छा या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन यातून मार्ग काढावे लागेल.