Mismanagement Of Vande Bharat : ‘वन्दे भारत’ रेल्वेमध्ये हिंदी आणि मराठी भाषांतील एकत्रित हास्यास्पद सूचना !

हिंदु जनजागृती समितीचे हर्षद खानविलकर यांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाकडून पालट करण्याचे आश्‍वासन !

मुंबई – सर्वसुविधांनी युक्त आणि अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करण्यात आलेल्या ‘वन्दे भारत’ रेल्वेमधील डब्यांमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सूचनांमध्ये मात्र शब्दांच्या असंख्य चुका आहेत. काही सूचनांमध्ये हिंदी आणि मराठी एकत्रित करून लावण्यात आलेल्या सूचना अत्यंत हास्यास्पद असून रेल्वे प्रशासनाचे वाभाडे काढणार्‍या आहेत. हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर हे ६ नोव्हेंबर या दिवशी ‘मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ या ‘वन्दे भारत’ रेल्वेने मुंबईमध्ये येत होते. या सूचनांमध्ये असलेल्या चुका त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याविषयी रेल्वे प्रशासनाला ‘एक्स’ खात्यावर संदेश पाठवून याविषयी माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच रेल्वे प्रशासनाने दूरभाष करून, तसेच ‘एक्स’ खात्यावर प्रतिसाद देऊन सूचनांमध्ये सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले.

श्री. हर्षद खानविलकर

१. रेल्वेच्या डब्यामध्ये ‘स्वचालित दरवाजा’ अशी सूचना लावण्यात आली होती. यामध्ये ‘स्वचलित द्वार’ असे हिंदीमध्ये अपेक्षित होते.

२. सूचनेमध्ये ‘दरवाजा स्वत: खुलेगा व बंद होगा’ असे मराठी आणि हिंदी एकत्रित घुसडण्यात आले होते. यामध्ये ‘द्वार अपने आप खुलेगा और बंद होगा।’ असे वाक्य अपेक्षित होते.