उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन !
अकोला – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता नवीन भारत आहे. आता भारताकडे वाकड्या नजरेने बघितले, तरी ‘सर्जिकल स्ट्राईक’ होऊन अर्धा पाकिस्तान भीतीने थरथरायला लागतो. चीनचे सैनिक माघारी जात आहेत, तर भारतीय सैनिक गस्त घालत असल्याचे चित्र आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांनी केले. वाशीम येथे महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले,…
१. महाराष्ट्र ही संत, महापुरुष यांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. देशात कुठेही राष्ट्रीय भावनेला ठेच पोचते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण होते. देशाचा स्वाभिमान आणि सन्मान यांच्यासाठी महाराजांनी संघर्ष केला. आजही त्यांच्या प्रेरणेतून देश आणि समाज यांच्यासाठी कार्य केले जात आहे.
२. वर्ष १९४७ पासून निरंतर सत्ता चालवण्याची संधी काँग्रेसला मिळाली होती; मात्र काँग्रेसने देश आणि राष्ट्रीयत्व यांसाठी प्रामाणिकपणे कार्य केले नाही.
३. भारताच्या सुरक्षेचा काँग्रेसनेच र्हास केला. पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करत होता, देशात घुसखोरी चालू होती. देशात बाँबस्फोट घडवून आणले जात होते. चीन भारताच्या भूमीवर अतिक्रमण करत होता. काँग्रेसच्या नेत्यांना मात्र संबंध बिघडण्याची काळजी होती; पण देशाची चिंता नव्हती.
४. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुती, तर दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. देश, धर्म, राष्ट्रीयता, समाजातील मूल्य आणि आदर्शांची चिंता नसणारी ही महा ‘अडाणी’ आघाडी आहे.