स्वतःवर प्रयोग करून ‘मंत्रसामर्थ्य आणि उचित साधना’ यांद्वारे प्रारब्धावरही मात करता येते’, हे सिद्ध करून दाखवणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

१. योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या कुंडलीमध्ये विदेशात जाण्याचा योग नसणे; पण ते ११ देशांमध्ये जाऊन आले असणे आणि ‘अपवादात्मक स्थिती वगळता साधनेने स्वत:च्या प्रारब्धात पालट करू शकतो’, असे त्यांनी सांगणे

प.पू. दादाजी वैशंपायन

‘योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या साधनेच्या आरंभीच्या काळात त्यांनी स्वतःची जन्मकुंडली त्या वेळच्या २ तज्ञ ज्योतिषांना दाखवली आणि विचारले, ‘‘माझ्या कुंडलीमध्ये विदेशात जाण्याचा योग आहे का ?’’ यावर दोन्ही ज्योतिषतज्ञांकडून उत्तर आले होते, ‘‘कुंडलीमध्ये विदेशात जाण्याचा योग नाही.’’ खरेतर योगतज्ञ दादाजींनाही ज्ञात होते की, ‘आपल्या जन्मकुंडलीत ‘विदेशयोग’ नाही’, तरी त्यांनी तज्ञ ज्योतिषांना विचारून याची निश्चिती करून घेतली. असे जरी असले, म्हणजे विदेशात जाण्याचा योग नसला, तरी योगतज्ञ दादाजी त्यांच्या कार्यकाळात गरजू व्यक्तींच्या ‘संकटनिर्मूलनार्थ’ ११ देशांमध्ये जाऊन आले होते. जन्मकुंडलीत जरी विदेशात जाण्याचा योग नव्हता, तरी त्यांनी तो योग घडवून आणला होता. यावर ते म्हणाले, ‘‘अपवादात्मक स्थिती वगळता आपण साधनेने स्वत:च्या प्रारब्धात पालट करू शकतो !’’

२. मंत्रसामर्थ्याचा पहिला प्रयोग योगतज्ञ दादाजींनी स्वतःवर करणे आणि ‘योग्य मार्गाने साधना करून प्रारब्धातील काही गोष्टी दैवी शक्तीच्या कृपेने पालटू शकतो’, असा दावा सिद्ध करून दाखवणे

श्री. अतुल पवार

योगतज्ञ दादाजी यांच्या घराण्यातील सहा पिढ्यांमध्ये एकुलता एकच पुत्र असण्याची परंपरा होती. भृगुसंहितेमध्ये योगतज्ञ दादाजींच्या संदर्भातही तशीच नोंद होती; परंतु मंत्रसामर्थ्याने त्यात पालट करून त्यांनी दोन पुत्ररत्नांच्या प्राप्तीचा लाभ करून घेतला. मंत्रसामर्थ्याचा पहिला प्रयोग योगतज्ञ दादाजींनी आधी स्वतःवरच केला. या प्रयोगामुळे ‘मंत्रसामर्थ्याने आपण दुसर्‍यांच्या दुःखाचे निवारण करू शकतो’, याची त्यांना निश्चिती झाली. योगतज्ञ दादाजी म्हणाले, ‘‘आपण योग्य मार्गाने साधना करून प्रारब्धामधील काही गोष्टी दैवी शक्तीच्या कृपेने पालटू शकतो’, हा माझा दावा मी अनेक बुद्धीवादी व्यक्ती, तसेच मूळ ‘भृगुसंहिता’ वाचून अनुभव घेत असलेल्या व्यक्ती यांना सिद्ध करून दाखवला आहे.’’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.८.२०२४)