स्वैराचारी गाणी गाणारा यो यो हनीसिंग कि शिवभक्त हिरदेश सिंग ?

१. यो यो हनीसिंगने गायली उच्छृंखल गाणी

वर्ष २०१० ते २०१३ च्या दरम्यान यो यो हनीसिंग (हिरदेश सिंग) नावाच्या ‘रॅपर’ला (रॅपर म्हणजे पाश्चात्य पद्धतीची गाणी गाणारा गायक) पुष्कळ प्रसिद्धी मिळाली होती. त्याची ‘हिप हॉप’ प्रकारातील रॅप गाणी तेव्हा पुष्कळ प्रसिद्ध झाली होती. त्याच्या गाण्यांमध्ये ‘दारू’, ‘सिगारेट’, ‘नशा’ असे शब्द सर्रास वापरले जायचे. गाण्यांचे व्हिडिओही अतिशय उच्छृंखल होते. तेव्हा या गायकाला हिंदी चित्रपटसृष्टीत डोक्यावर घेतले गेले. त्याचे अल्बम प्रसिद्ध झाले. काही हिंदी चित्रपटांत त्याची गाणी घेतली गेली. अगदी अल्प कालावधीत हा गायक ‘स्टार’ (प्रसिद्ध) झाला होता.

जेव्हा मी ती गाणी पाहिली, ऐकली, तेव्हा त्यांतील असंबद्ध शब्दरचना, व्हिडिओमधील कलाकारांची भडक रंगभूषा आणि कपडे असलेले हिप-हॉप प्रकारातील नाचणे बघून त्यात आसुरीपणा (satanic nature) अधिक प्रमाणात जाणवला होता. एरव्ही ‘बॉलीवूड’ (हिंदी चित्रपटसृष्टी) हे अनैतिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध आहेच; पण यो योच्या गाण्याने जणू ‘त्याला सैतानी पंथाचा प्रचार करायचा आहे’, असे वाटायचे. त्या वेळी हनीसिंगच्या गाण्याने नकारात्मकतेचा कहर गाठला होता. ‘जेवढी जास्त नकारात्मकता, तेवढी त्याची तरुण पिढीमध्ये जास्त नशा’, असे आपल्याकडील समीकरण आहे.

२. दारु आणि नशा यांना प्रोत्साहन देणार्‍या गाण्यांची पार्श्वभूमी

यो यो हनीसिंगचे मूळ नाव हिरदेश सिंग ! नुकतीच हिरदेश सिंगची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्याने काही महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलेले आहे. आईकडून आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेला हिरदेश लहानपणी कीर्तन करायचा, तबला वाजवायचा. शाळेत काहीतरी छोटीशी घटना घडली आणि तेराव्या वर्षी तो पूर्ण नास्तिक झाला. असभ्य आणि अश्लील सादरीकरणामुळे प्रारंभी त्याच्या गाण्यांना विरोधही झाला होता. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असतांना गाण्यातील दारू आणि नशेच्या प्रोत्साहनाला तेथील काही शीख बांधवांनी विरोध केला होता. त्याचा राग मनात ठेवून हिरदेशने ‘मी ही दारू लहान मुलांच्या मनामनात ठसवीन’, असे ठरवून ‘चार बोटल वोडका, काम मेरा रोज का’ हे गाणे लिहिले. गातांना मुद्दाम लहान मुलांच्या पद्धतीने गायले. ते गाणे तरुण पिढीमध्ये प्रसिद्ध झाले. शाळेतील स्नेहसंमेलने असोत किंवा मुलांचे नृत्यवर्ग असोत, सगळीकडे या गाण्याने थैमान घातले होते. छोटी छोटी मुले ज्यांना दारू काय असते, हे ठाऊकही नाही, त्यांना त्यांचे पालक या गाण्यावर थिरकण्यासाठी प्रोत्साहन देत होते. कार्यालयातील मेजवान्या, हॉटेल-पबमधील डीजेमध्ये हनीसिंगचे हे गाणे आणि इतरही गाणी प्रसिद्ध होती. त्याच्या संगीताने सगळी तरुण पिढी अक्षरशः वेडी झाली होती.

३. हिरदेशला झाली उपरती

अशी गाणी लिहिणारी हिरदेश आज म्हणतो, ‘‘काय अर्थ आहे माझ्या गाण्यांच्या शब्दरचनेला ? माझे एकही गाणे मलाच श्रवणीय वाटत नाही. ही गाणी एवढी का चालली ?, हेच मला कळत नाही. आतापर्यंत मी माझ्या गाण्यातून चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले. ‘Super power’चा (भगवंताचा) अपमान केला. गाण्यातून सैतानी प्रवृत्तींचा गौरव केला.’’ ही स्वीकृती त्याने मुलाखतीत दिली.

मध्यंतरीच्या काळात हिरदेश स्वत: नशेच्या इतका आहारी गेला की, त्याचे भविष्य त्यात अडकले. प्रकृती बिघडली. तो Bipolar Disorder चा रुग्ण झाला. यातून बाहेर पडायला त्याला ७ वर्षे लागली. अजूनही पूर्णपणे तो बरा झालेला नाही. औषधोपचार चालू आहेत; पण या आजारपणाच्या काळात त्याची भगवान महादेवावर श्रद्धा बसली. आता एका नव्या पद्धतीने आपले गायनक्षेत्रातील कार्य चालू करण्याचा त्याचा मानस आहे. आज हिरदेशची स्वत:ची भाचेमंडळी किशोरावस्थेत आहेत. हिरदेशला ‘त्याच्या भाच्यांनी त्याची पूर्वीची गाणी ऐकू नयेत किंवा बघू नयेत’, असे वाटते. ‘ती गाणी बघून त्यांनी काही प्रश्न विचारले तर…?’, अशी त्याला भीती वाटते.

४. हिरदेशच्या विचारांत झालेले परिवर्तन

आपल्या हातून चुका होणार, हे विधीलिखित असते; पण ‘त्या चुकांची जाणीव आपल्यावर भगवंताची कृपा असल्याविना होत नाही’, असे हिरदेश म्हणतो. आज भारत सरकारच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचा प्रसारदूत (Brand Ambassador) म्हणून काम करतांना तरुणाईला तो नशेपासून दूर रहाण्याचे आवाहन करत आहे. हिरदेशचा ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्र यांच्यावर विश्वास आहे. त्याला चांगले अनुभवही येत आहेत. ‘जे ज्योतिषावर विश्वास ठेवतात, तेच त्याला शास्त्र मानतात. खरे शास्त्रज्ञ त्याला शास्त्र मानत नाहीत’, असे म्हटल्यावर हिरदेश उत्तर देतो, ‘‘जगात वेगवेगळ्या प्रकारचे नशेचे पदार्थ शोधणारे पण शास्त्रज्ञच आहेत. ‘असे शास्त्रज्ञ देव नाहीत’, असे म्हणतात; पण मी देवाला मानतो. माझा अध्यात्माचा प्रवास नुकताच चालू झाल्याने तो पुष्कळ छोटा आहे; पण मी प्रतिदिन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.’’

५. स्वैराचाराला प्रोत्साहन देणार्‍यांमुळे समाजाची मोठी हानी

हिरदेशमध्ये खरेच एवढा आमूलाग्र पाटल झाला आहे की ‘करियर’ नव्याने आरंभ करतांना येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करणे किंवा प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न आहे, हे येणार्‍या काळात आपल्याला कळेलच ! असे झाले, तरी या काळात त्याच्या गाण्यांमुळे किती तरुण मुलांच्या मनावर परिणाम झाले असतील ? आज त्यांच्या आयुष्यात काय काय घडून गेले असेल ? त्यांच्या कुटुंबांची काय स्थिती असेल ? याची आपण कल्पनाच न केलेली बरी ! हीच सगळी तरुण मुले देशाचे उत्तरदायी नागरिक बनण्यापासून दूर गेली असण्याची शक्यताच अधिक आहे.

समाजात नकारात्मकता पसरवणारे आणि आसुरी वृत्तींना खतपाणी घालणारे अनेक घटक सामाजिक माध्यमांवर कार्यरत आहेत, याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे. दारू पिणे, नशा करणे, इतर व्यभिचार करणे, हे सगळे इतके सर्रासपणे पडद्यावर दाखवले जाते की, त्याचे तरुणांना काहीही वाटेनासे झाले आहे. त्यातून उद्भवणार्‍या दुष्परिणामांवर चर्चा व्हायला हवी. एखादा हिरदेश कधीतरी धाडस करून आपल्या चुकीच्या कृतींविषयी उघडपणे बोलतो. पडद्यावरील आभासी जगतामुळे दारू पिणे, नशा करणे, त्यासाठी छोटे-मोठे गुन्हे करणे हे आपल्या समाजाने जणू सामान्य म्हणून मान्य केले आहे. आज महिलांच्या संदर्भात होणार्‍या गुन्ह्यांमध्ये मद्य आणि नशा हे एक प्रबळ कारण आहे. महिलांवर प्रत्यक्ष अत्याचार करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्याला शिक्षा होते; पण त्याच्या डोक्यात दारू आणि इतर नशा यांविषयीचे वेड पसरवणार्‍यांवर, मुलींशी कसेही वागून चालते, हे माध्यमांवर दाखवणार्‍यांवर, वासनेसाठी कुठल्याही टोकाला जाणारा नायक दाखवणार्‍यावर किंवा पैशांसाठी अल्प कपडे घालून तेही ‘my body my choice’ असल्या स्वैराचारी कल्पनेत देहप्रदर्शन करणार्‍या नट्यांवर कुठला गुन्हा कधी नोंदवला जातो का ? किंवा किमान त्यांना त्यांच्या अशा वागण्यामुळे समाजावर होणार्‍या दुष्परिणामांची जाणीव तरी करून दिली जाते का ?

६. गंभीर सामाजिक परिणामांसाठी शिक्षा भोगावीच लागणार !

यावर एक सोयीचे स्पष्टीकरण सिद्ध असते की, अशा कलाकृतींना ‘अ’ प्रमाणपत्र असते. १८ वर्षे वयाखालील व्यक्तींनी ते पाहू नये. १८ वर्षे वयाच्या पुढील व्यक्तींनी ते केवळ मनोरंजन म्हणून बघावे; पण समाजात वावरतांना आपला सद्सद्विवेक टिकवून ठेवावा. एवढे सांगून दायित्व टाळले जाते. आपण समाजाला जे दाखवतो, ऐकवतो, समाजमनावर बिंबवतो, त्याचे समाजावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ते कुणाकुणाला कशा स्वरूपात भोगावे लागू शकतात याचा विचार कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक यांनी करायला हवा. केवळ पैशासाठी हा वर्ग नैतिकतेची बंधने झुगारून द्यायला सिद्ध होत असेल, तर यामुळे समाजात होणार्‍या समष्टी पापाचे भागीदार हे केवळ प्रत्यक्ष गुन्हेगार नसून अप्रत्यक्षपणे चुकीच्या गोष्टींचा पुरस्कार करणारा आणि पाठिंबा देणारा हा वर्गपण आहे. कर्मफलन्यायानुसार त्याची शिक्षा ही त्यांनाही भोगावीच लागणार आहे.

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– श्री. अनिकेत विलास शेटे, पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे.