आज बलीप्रतिपदा आहे. त्या निमित्ताने…
कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ अर्थात् दिवाळी पाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी गोवर्धन पूजनही केले जाते. श्रीकृष्णाने वृंदावनात याच दिवशी गोवर्धन पर्वताचे पूजन केले होते.
बलीप्रतिप्रदेची कथा अशी आहे की, अतिशय पराक्रमी आणि दानशूर अशा बळीराजाने इंद्रपद मिळवण्यासाठी अनेक यज्ञ केले. ‘इंद्रपद बळीराजाला प्राप्त झाले, तर त्याच्यातील आसुरीवृत्तीचा प्रजेला त्रास होईल’, अशी भीती निर्माण झाली; म्हणून श्रीविष्णूने यावर युक्ती करून बटु वामनाचा अवतार धारण केला. बटु वामनाने बळीराजाकडे केवळ ३ पावलांएवढेच भूमीचे दान मागितले. दानशूर अशा बळीराजाने त्वरित ते दान िदले; परंतु वामनाच्या रूपातील श्रीविष्णूंनी २ पावलांतच सारे विश्व व्यापून टाकले आणि ‘तिसरे पाऊल कुठे ठेवू’, असे विचारले असता बळीने स्वतःचे मस्तक पुढे केले. वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवताच बळी पाताळात गेला. श्रीविष्णूने त्याला पाताळाचे राज्य दिले. प्रजेची आणि देवादिकांची काळजी मिटली अन् इंद्रपद सुरक्षित राहिले. श्रीविष्णु बळीच्या औदार्यावर संतुष्ट झाले आणि ‘हा दिवस बलीप्रतिपदा म्हणून साजरा केला जाईल’, असा वर त्याला दिला.
हा दिवस पती-पत्नीच्या प्रेमळ नात्याचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. ‘नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्णाने सर्वांना अभय दिले. त्या आनंदाप्रित्यर्थ सत्यभामा आणि रुक्मिणी यांनी श्रीकृष्णाला ओवाळले अन् भगवंताने दोघींना भेट म्हणून भरजरी वस्त्रे, तसेच अलंकार दिले; म्हणून आजही या दिवशी पत्नी पतीला ओवाळते अन् पती ओवाळणी घालतो’, अशी प्रथा रूढ आहे. कर्तृत्व, आदर, प्रेम आणि कृतज्ञता हे दिव्याच्या साक्षीने व्यक्त करण्याचा हा दिवस !
– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली
(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक)