वसुबारसनिमित्त वारंगांची तुळसुली येथील गोशाळेत सवत्स धेनूचे पूजन
कुडाळ – तालुक्यातील वारंगांची तुळसुली येथे २८ ऑक्टोबर या दिवशी गोवत्स द्वादशी अर्थात् वसुबारसनिमित्त श्री. आनंद वारंग यांच्या गोशाळेत सवत्स धेनूचे पूजन करण्यात आले. श्री. संजय आठल्ये आणि श्री. लक्ष्मण घाटे यांनी पौरोहित्य केले. पूजनानंतर तीर्थप्रसाद देण्यात आला. उपस्थितांनी गोमातेचे दर्शन घेऊन पूजन केले. या वेळी पाऊस असूनही महिला आणि पुरुष मिळून एकूण ५० जण उपस्थित होते. ‘या गोशाळेसाठी निधीची आवश्यकता आहे’, असे आवाहन सामाजिक माध्यमातून केल्यावर केवळ २४ घंट्यांत ५० सहस्र रुपयांचा निधी गोप्रेमींनी सढळ हस्ते केलेल्या अर्पणातून गोळा झाला. गोरक्षणाच्या दृष्टीने गोप्रेमींची ही कृती सर्वत्रच्या हिंदूंसाठी आदर्शवत अशीच आहे.
गोरक्षणासाठी गोप्रेमींची आदर्श कृती
प्रारंभी श्री. विवेक मुतालिक यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती देतांना सांगितले की, ‘श्री. आनंद वारंग हे एक विश्वस्त मंडळ स्थापन करून या गोशाळेसाठी एक आधार उभा करत आहेत. त्यांना तातडीचे आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी सामाजिक माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ २४ घंट्यांत ९२ जणांनी मिळून एकूण ४६ सहस्र १२३ रुपयांचे साहाय्य केले. ही गोष्ट गोवंशियांचे रक्षण करणार्यांचा उत्साह वाढवणारी आहे.’
गोरक्षणासाठी यापुढेही साहाय्य करण्याचे गोप्रेमींना आवाहन
यानिमित्त गोपालनाचे महत्त्वाचे कार्य करणारे श्री. वारंग यांचा श्री. भगीरथ नाडकर्णी यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच गोप्रेमींनी दिलेला निधी वैद्य सुविनय दामले आणि श्री. संजय आठल्ये यांच्या हस्ते श्री. वारंग यांना सुपुर्द करण्यात आला. सौ. मृणाल देसाई आणि सौ. अंजली मुतालिक यांनी म्हटलेल्या ‘गो अष्टका’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
श्री. आनंद करपे यांनी यजमान कुटुंबियांच्या वतीने सर्व शिवप्रेमी आणि गोप्रेमी, माता, बंधू आणि भगिनी यांचे आभार व्यक्त करून यापुढेही सहकार्य करत रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.