मडगाव, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मडगाव येथे श्रीकृष्णपूजन आणि नंतर मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचा ५३ वा श्रीकृष्ण पालखी उत्सव होता. पाजीफोंड, मडगाव येथील श्री हरि मंदिरात सर्वप्रथम श्री कृष्णाची विधीवत् पूजा करण्यात आली. पूजेचे यजमानपद श्री. नवल नाईक आणि सौ. प्रियांका नाईक यांनी भूषवले. या वेळी मडगावचे आमदार श्री. दिगंबर कामत, नावेलीचे आमदार श्री. उल्हास तुयेकर, श्री. योगिराज दिगंबर कामत, नवयुवक हौशी मंडळाचे अध्यक्ष श्री. सुबोध गोवेकर, सचिव श्री. सुजय लोटलीकर आणि इतर मान्यवर अन् भाविक उपस्थित होते.
श्रीकृष्णपूजन झाल्यानंतर मडगाव शहरातून श्रीकृष्णाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ही मिरवणूक नगरपालिका चौकात आली. या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. मिरवणूक मार्गावर, तसेच नगरपालिका चौकात अनेकांनी दर्शन घेतले. सर्वत्र नरकासुर प्रतिमांची मिरवणूक चालू असतांना नवयुवक हौशी मंडळाने गेली ५३ वर्षे चालू ठेवलेल्या श्रीकृष्ण पालखी उत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.