१. ‘ऑनलाईन साधना सत्संगा’त साधनेचे विविध पैलू शिकायला मिळणे
‘मला सनातन संस्थेने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन साधना सत्संगा’त सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामध्ये ‘साधना म्हणजे काय ? नामजपाचे महत्त्व काय ? आपल्यात कोणते स्वभावदोष असतात ? त्यांचे निर्मूलन कसे करायचे ?’, हे शिकायला मिळाले. स्वभावदोषांची सूची पाहिल्यावर ‘हे सगळे स्वभावदोष आपल्यात आहेत आणि स्वतःला कुणीतरी आरसा दाखवत आहे’, असे मला वाटले. ‘साधनेमुळे मन आनंदी कसे ठेवावे ? चिंतेचे विचार मनात आल्यावर किंवा चिडचिड झाल्यास संबंधित स्वभावदोषाच्या मुळाशी कसे जावे ? आणि तो स्वभावदोष दूर करण्यासाठी योग्य पद्धतीने स्वयंसूचना कशा प्रकारे द्यावी ?’ इत्यादी गोष्टी माझ्या लक्षात आल्या.
२. पायाला दुखापत झाल्यावरही गुरुकृपेने सत्मध्ये रहाता येणे
२ अ. ‘सनातन गौरव दिंडी’त सहभागी होता येणे : ‘सनातन गौरव दिंडी’च्या ८ दिवस आधी माझ्या पायाला दुखापत झाली. मी देवाला प्रार्थना केली आणि ठरवले की, ‘जितके चालता येईल, तितके दिंडीत पायी सहभागी व्हायचे आहे.’ त्या वेळी मी दिंडीत सहभागी होऊ शकले आणि ‘गुरुदेव सूक्ष्मातून साहाय्य करतात’, याची मी अनुभूती घेतली.
२ आ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करता येणे : मला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्याची संधी प्राप्त झाली. ही सेवा करतांना मला आनंद मिळाला आणि सत्सेवेचे महत्त्वही कळले. ‘माझ्या पायाला दुखापत झाल्यामुळे साप्ताहिकाच्या वितरणाच्या सेवेत खंड पडेल’, असे मला वाटत होते; पण गुरुदेवांच्या आशीर्वादाने या सेवेत खंड पडला नाही. त्यामुळे मला पुष्कळ समाधान वाटले.
‘अशा प्रकारच्या अनुभूती मला अनेक प्रसंगांत येत आहेत. ‘साधना केल्याने आत्मबळ वाढते’, हे मला अनुभवायला येत आहे’, याबद्दल मी जगद्गुरु श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. रसिका झांबरे, कोथरुड, पुणे. (८.८.२०२४)
|