अत्यंत कठीण प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून स्थिर रहाणारे लोंढे कुटुंबीय !
‘मुलीच्या निधनाच्या प्रसंगी श्री. लोंढेकाका ‘सर्वांना संपर्क करणे, नियोजन करणे’, या कृती करत होते. त्याच वेळी ते नातीलाही सांभाळत होते. कठीण प्रसंगातही ते स्थिर राहून सर्व समन्वय करत होते. सर्व लोंढे कुटुंबीय गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे स्थिर राहून हा कठीण प्रसंग हाताळत होते.
कु. श्रद्धा लोंढे रामनाथी आश्रमातून बहिणीच्या गावी जाईपर्यंत साधक तिला साहाय्य करत होते. तेव्हा गुरुदेवांनी आपत्काळात साधकांच्या माध्यमातून आध्यात्मिक कुटुंबच निर्माण केल्याची प्रचीती घेता आली.’
– (पू.) सौ. मनीषा महेश पाठक, पुणे (१९.१०.२०२४)
भाद्रपद कृष्ण चतुर्दशी (१.१०.२०२४) या दिवशी सौ. स्नेहा मयूर वाघमारे (वय ३२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात् निधन झाले. ३१.१०.२०२४ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सौ. सुलभा लोंढे (कै. (सौ.) स्नेहा यांची आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५७ वर्षे), सातारा
१ अ. साधना आणि गुरुसेवा यांची तळमळ
१. ‘स्नेहा कामावरून घरी आल्यावर नामजप करत असे.
२. ती प्रासंगिक सेवांत सहभागी होत असे. ‘गुरुपौर्णिमेला अर्पण गोळा करणे, घरगुती कार्यक्रमांत सनातनची सात्त्विक उत्पादने भेट म्हणून देणे’, अशा सेवा ती करत असे.
३. पितृपक्षात ती तिच्या काही मैत्रिणींना दत्ताच्या नामजपाचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून सामूहिक नामजप करून घेत असे.
१ आ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१ आ १. मुलीच्या निधनाविषयी कळल्यावर नामजप चालू असणे आणि ‘गुरुदेवांनीच स्थिर ठेवले’, असे जाणवणे : स्नेहाच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर नंतर तिच्या घरी जात असतांना प्रवासात माझा नामजप चालू होता. तिची आठवण येऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते; परंतु ‘गुरुदेवच मला स्थिर ठेवून त्यातून बाहेर काढत आहेत’, असे मला जाणवले.
१ आ २. स्नेहाचा चेहरा पिवळसर दिसत होता. तिच्या देहाभोवती पिवळ्या किरणांचे वलय जाणवत होते.
१ आ ३. तिच्या पार्थिवाला अग्नी देतांना ‘सर्वपित्री अमावास्या’ ही तिथी चालू झाली होती, तरीही वातावरणात दाब जाणवत नव्हता.
१ आ ४. तिच्या वास्तूभोवती चैतन्य जाणवत होते. हा पालट घरी आलेल्या समाजातील व्यक्तींनाही जाणवत होता.’
२. श्री. सुनील लोंढे (कै. (सौ.) स्नेहा यांचे वडील, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५९ वर्षे), सातारा
२ अ. नातेवाईक आणि कार्यालयातील कर्मचारी यांना आधार वाटणे
१. ‘स्नेहा प्रेमाने आदरातिथ्य करणारी आणि इतरांना साहाय्य करणारी होती. आम्हाला तिचा आधार वाटायचा’, असे भेटायला आलेल्या नातेवाइकांनी सांगितले.
२. स्नेहाच्या निधनानंतर ती नोकरी करत असलेल्या आस्थापनाचे मालक आणि तेथील सहकारी कर्मचारी आम्हाला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘स्नेहा धाडसी, कष्टाळू आणि जिद्दी होती. ती ताण न घेता कार्यालयातील दायित्व पार पाडायची. आम्हाला तिचा आधार होता.’’
३. सौ. स्वप्ना विनोद चव्हाण (कै. (सौ.) स्नेहा यांची मोठी बहीण), सातारा
अ. ‘स्नेहाचे निधन झाल्याचे कळल्यावर प्रथम मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना केली. घरात उदबत्ती लावली आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ जवळ घेऊन नामजप करू लागले.
आ. स्नेहाच्या घरी जातांना पूर्ण प्रवासात मी दत्ताचा नामजप आणि गुरुदेवांचा धावा करत होते.
इ. पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४२ वर्षे) यांचा भ्रमणभाष आल्यानंतर त्यांच्या वाणीतून मला दैवी ऊर्जा मिळाली.
ई. स्नेहाचे पार्थिव पाहिल्यावर ‘ती गुरुदेवांच्या चरणी झोपली आहे’, असे मला जाणवत होते. मला तिच्या भोवती चैतन्याचे वलय जाणवत होते.’
४. कु. श्रद्धा लोंढे (कै. (सौ.) स्नेहा यांची लहान बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ अ. बहिणीची शारीरिक स्थिती गंभीर असल्याचे कळल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘निर्गुण’ हा नामजप करणे : ‘१.१०.२०२४ या दिवशी मला बाबांनी भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘स्नेहाला रुग्णालयात भरती केले आहे. तिची स्थिती गंभीर आहे.’’ आम्ही (मी, माझी सर्वांत मोठी बहीण (सौ. स्वप्ना चव्हाण) आणि माझी आई) सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘निर्गुण’ हा नामजप करत होतो.
४ आ. बहिणीच्या मृत्यूविषयी कळल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धीर दिल्यामुळे प्रसंगाला सामोरे जाण्याची मनाची सिद्धता होणे : मी बाबांशी बोलल्यावर त्यांनी मला स्नेहाचे निधन झाल्याचे सांगितले. आरंभी त्यांनी जे सांगितले, त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना भेटून सर्व प्रसंग सांगितला. त्यांनी मला दत्ताचा नामजप करायला सांगितला. त्या माझ्या बाबांशी भ्रमणभाषवर बोलल्या. घरातील अन्य सदस्यांना स्नेहाताईच्या मृत्यूविषयी ठाऊक नव्हते. ‘ते त्यांना कसे सांगायचे ? ते ऐकल्यावर त्यांची स्थिती कशी होईल ?’, या विचारांनी मला काहीही सुचत नव्हते. श्रीसत्शक्ति बिंदा (सौ.) सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘प्रत्येक जीव ठरलेले श्वास घेऊन जन्माला आलेला असतो. त्यामुळे आता केवळ ‘परिस्थितीला सामोरे जाणे’, एवढेच आपल्या हातात आहे. तू स्थिर राहून परिस्थितीला सामोरी जा. तू वैकुंठातून जात आहेस. तुझ्या समवेत गुरुतत्त्व येणार आहे.’’ त्यांच्या बोलण्याने मला आधार वाटला. त्या एकीकडे माझी मनाची सिद्धता करून घेत असतांना ‘माझ्या समवेत गावाला कोण येईल ? तसेच माझ्या प्रवासाची सिद्धता, जेवणाचा डबा’, या सर्वांचे नियोजन करत होत्या. मी गावाला जायला निघत असतांना त्यांनी मला भ्रमणभाष करून ‘तुझा नामजप चालू आहे का ?’, असे विचारले. त्यांनी मला अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार न करता नामजपावर मन एकाग्र करण्यास सांगितले.
४ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधिका आणि तिचा भाऊ यांना विमानतळावरून गावाला नेण्यासाठी साधकांचे नियोजन करणे : माझा भाऊ (श्री. चैतन्य) हा देहली येथून येणार होता. ‘वाटेत त्याला काही त्रास होऊ नये आणि विमानतळावर आल्यावर पुढे त्याच्या समवेत कुणीतरी असावे’, असे मला वाटत होते. याविषयी मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्यांनी आम्हा दोघांना विमानतळावरून गावाला नेण्यासाठी साधकांचे नियोजन केले.
४ ई. पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे मिळालेले अनमोल साहाय्य ! : पुणे येथून पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे मला अनमोल साहाय्य मिळाले. पू. ताईंना तीव्र शारीरिक त्रास असतांनाही त्या पुणे येथील विमानतळावर माझी वाट पहात पुष्कळ वेळ थांबल्या होत्या. त्यामुळे भाऊ माझ्या आधी पोचल्यावर ‘त्याच्या जवळ कुणीतरी असायला हवे’, याचे नियोजन देवाने आधीच केले होते’, असे मला जाणवले. या प्रसंगातून मला गुरूंची कृपा अनुभवण्यास मिळाली. त्या वेळी ‘साधकाच्या स्थितीचा विचार करून नियोजन करणे’, हे केवळ सनातन संस्थेमध्येच पहायला मिळते’, असे मला वाटले.
४ उ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. ताईच्या निधनानंतर घरात दाब जाणवत नव्हता.
२. रामनाथी आश्रमातून आणलेली विभूती आम्ही तिच्या पार्थिव देहाला लावली. सर्व विधी होईपर्यंत नामजप आणि प्रार्थना आपोआप होत असल्याचे मला गुरुकृपेने अनुभवता आले.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, पू. (सौ.) मनीषाताई, तसेच अनेक साधक यांनी आधार दिल्यामुळे आम्हाला या कठीण प्रसंगाला सामोरे जाता आले’, याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
५. सौ. भक्ती डाफळे (साधिका), क्षेत्रमाहुली, जिल्हा सातारा
‘मुलीचे निधन झाल्याचे समजल्यावर श्री. लोंढेकाका आणि काकू पुष्कळ स्थिर होते. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे ते स्थिर राहून या प्रसंगाला सामोरे जाऊ शकले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १९.१०.२०२४)
दुःखद प्रसंगाला सामोर्या जाणार्या स्वतःच्या कुटुंबियांविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे !
१. सौ. सुलभा लोंढे आणि श्री. सुनील लोंढे (कै. (सौ.) स्नेहा यांचे आई आणि वडील)
अ. ‘स्नेहाताईच्या निधनाच्या प्रसंगी आई-बाबांनी स्थिर राहून अन्य नातेवाइकांना आधार दिला. ‘आपल्या मुलीचे मृत्यूनंतरचे सर्व विधी भावपूर्ण व्हावेत’, यासाठी ते प्रयत्न करत होते.
२. श्री. मयूर वाघमारे (कै. (सौ.) स्नेहा यांचे यजमान)
अ. श्री. मयूर हे या कठीण प्रसंगातही रात्री उशिरापर्यंत जागून आणि पहाटे उठून दत्ताचा नामजप पूर्ण करत होते.
३. कु. अद्विका मयूर वाघमारे (कै. (सौ.) स्नेहा यांची मुलगी, आध्यात्मिक पातळी ५३ टक्के, वय ७ वर्षे)
३ अ. परिस्थिती स्वीकारणे : अद्विकाला मध्ये मध्ये आईची आठवण यायची. त्यामुळे ती रडायची. तेव्हा आम्ही तिला प.पू. गुरुदेवांचे स्मरण करण्यास सांगत होतो. एके दिवशी ती आम्हाला म्हणाली, ‘‘आता आई नाही, तर मला बाबांचे ऐकावे लागेल.’’
३ आ. ‘आता सर्वकाही आजीकडून शिकायचे आहे’, हा समजूतदारपणा तिच्या बोलण्यातून जाणवला.
३ इ. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करणे : नातेवाईक रडत असतांना ती स्वतः जाऊन त्यांचे डोळे पुसायची. आईची आठवण आली, तर सर्वांसमोर दुःख व्यक्त न करता ती मला बाजूला नेऊन सांगायची. कधी कधी ती कुणाला न सांगता स्वतःच सावरण्याचा प्रयत्न करायची.
३ ई. याही स्थितीत तिने तिच्या आजोबांना (वडिलांच्या वडिलांना) वेळच्या वेळी औषध दिले. आता तिच्या सर्व कृती ती स्वतः करते.
३ उ. निधनानंतर दहाव्या दिवशी आईसाठी जेवणाचे पान ठेवल्यावर पानाजवळ पाणी आणून ठेवणे : ताईच्या निधनानंतर दहाव्या दिवशी तिच्यासाठी जेवणाचे पान ठेवतांना पाहून अद्विकाने तिच्या आजोबांना पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी पैसे मागितले. नंतर तिने ते पाणी एका द्रोणातून आणून ते जेवणाचे पान ठेवलेल्या ठिकाणी ठेवले. याविषयी तिला विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘आईला जेवल्यावर पाणी द्यायला हवे ना ?’’ त्या वेळी उपस्थितांना तिचे कौतुक वाटले.
या वेळी ‘तिच्या अनेक कृतींमधून उच्च लोकातील जीव आध्यात्मिक स्तरावर राहून प्रयत्न कसे करतात ?’, हे मला शिकायला मिळाले.
४. सौ. स्वप्ना विनोद चव्हाण (कै. (सौ.) स्नेहा यांची मोठी बहीण)
स्नेहाताईचे निधन झाल्याचे कळल्यावर स्वप्नाताई नातेवाइकांमध्ये न अडकता नामजप करण्याचा प्रयत्न करत होती.’
– कु. श्रद्धा लोंढे (कै. (सौ.) स्नेहा वाघमारे यांची लहान बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२४)