१. तमिळनाडूतील सुप्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिरासमोर निरीश्वरवादी पेरियार यांच्या पुतळ्याची उभारणी
‘तमिळनाडूच्या तिरूची येथे सुप्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिर आहे. ते विष्णूचे रूप रंगनाथ आणि त्यांची पत्नी ‘रंगनायकी’ जे लक्ष्मीचे रूप आहे, यांना समर्पित आहे. या मंदिरात वैष्णव धर्माच्या परंपरेचे पालन होते. या मंदिराची आर्थिक उलाढाल फार मोठी आहे. या धार्मिक ओळखीच्या पलीकडे जाऊन ‘युनेस्को’ ने या मंदिराला ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून ठेवले आहे. यासमवेतच वर्ष २०१७ मध्ये या मंदिराला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी ‘युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ मेरिट’ पुरस्कार मिळाला आहे. याठिकाणी डिसेंबर-जानेवारीमध्ये २१ दिवसांचा उत्सव साजरा होतो. त्यात किमान १० लाख भाविक उपस्थित रहातात. या मंदिराच्या समोरच वर्ष १९७२ मध्ये नास्तिक द्रविडीयन असलेल्या पेरियार यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हे चुकीचे आहे, असे श्रद्धाळू हिंदूंना वाटले, तर त्यात चुकीचे काही नाही.
पेरियार याने जीवनभर हिंदु संस्कृती, हिंदु देवता, संत आणि ऋषिमुनी यांच्यावर टीका केली. रामास्वामी म्हणत असत की, या पृथ्वीवर देव नाही आहे. जे देव मानतात, ते मूर्ख, असंस्कृत, रानटी आणि जंगली माणसे आहेत. यासमवेतच देवाचा प्रचार करणारे धर्मोपदेशक किंवा धर्मप्रचारक हे मवाली आणि डांबरट आहेत. वर्ष २००६ च्या डिसेंबरमध्ये अशा नास्तिक माणसाचा पुतळा श्री रंगनाथ मंदिरासमोर उभारण्यात आला, तसेच पेरियारच्या पुतळ्याखाली ‘देव आहे असे सांगणारे आणि तशी श्रद्धा ठेवणारे सगळे मूर्ख आहेत’, असे लिहिलेले आहे.
२. पेरियार यांच्या वादग्रस्त पुतळ्यासमोर आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी कनाल कन्नन यांच्या विरोधात गुन्हा नोंद
चेन्नईमध्ये ‘हिंदु मुन्नानी’च्या (हिंदू आघाडीवरच्या) वतीने सार्वजनिक सभेचे आयोजन केले होते. त्यात ‘आर्ट्स अँड लिटरली विंग’ने हिंदूंच्या देवीदेवता, उच्च रूढी आणि परंपरा यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. चित्रपट क्षेत्रात ‘ॲक्शन कोरिओग्राफर’ (एखादी गोष्ट करण्याची पद्धत दाखवणारे दिग्दर्शक) म्हणून काम करणारे कनाल कन्नन हे हिंदु मुन्नानी संघटनेचे कार्यकर्ता आहेत. कन्नन म्हणाले, ‘युद्ध आणि देश हे तलवार आणि युद्ध करून जिंकले जाते अन् इतर लोक (पंथ) हे धर्मांतराच्या माध्यमातून जग जिंकत आहेत.’ कन्नन यांनी पी.व्ही. रामास्वामी नायकर उपाख्य पेरीयर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या. कन्नन यांनी श्री रंगनाथ स्वामी मंदिरासमोर उभारलेल्या पेरियार याच्या पुतळ्याविषयी म्हटले, ‘पेरियार द्रविडीयन विचारसरणीचे होते. ते हिंदु देवांविषयी वाईट बोलत होते. त्यांचा पुतळा प्रसिद्ध श्री रंगनाथ मंदिरासमोर असणे चुकीचे आहे. ज्या दिवशी या पेरियारचा पुतळा पाडला जाईल, तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा फार मोठा दिवस असेल.’ त्यानंतर कन्नन यांच्या वक्तव्याविरुद्ध द्रविडयन लोकांनी आंदोलन केले. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी तमिळनाडू सरकारने कन्नन यांना अटक केली आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद केला.
३. कनाल कन्नन यांच्या बाजूने मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा
कन्नन यांनी प्रारंभी जामीन मिळवण्यासाठी आणि नंतर गुन्हा रहित करण्यासाठी याचिका केली. न्यायालयात युक्तीवादाच्या वेळी असा विषय चर्चिला गेला की, पेरियार यांचा पुतळा मंदिराच्या समोर उभारणे चुकीचे असून तो गुन्हा आहे. त्यामुळे ही कृती करणार्याच्या विरुद्ध दोन विचार, धर्म आणि जाती यांच्यात वैर निर्माण करून भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवायला पाहिजे. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष श्री. अण्णामलाई यांनी कन्नन यांची बाजू घेतली. ते म्हणाले, ‘‘पेरियार यांनी आयुष्यभर देव नाही, देव मानणारे चुकीचे आहेत, असे म्हटले होते. त्यातून त्यांनी हिंदूंचा अपमान केला होता. त्यामुळे आम्ही कन्नन यांच्या बाजूने आहोत.’’
याच वेळी कन्नन यांच्याविरुद्ध पेरियार द्रविड सदस्यांनी म्रदास उच्च न्यायालयात फौजदारी याचिका प्रविष्ट (दाखल) केली आणि ती न्यायमूर्ती जी. जयचंद्रन् यांच्यासमोर आली. न्यायालयात सरकारच्या वतीने कन्नन यांच्या याचिकेला प्रचंड विरोध करण्यात आला; पण सप्टेंबर २०२४ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना जामीन संमत केला. जामीन संमत करतांना त्यांनी अट घातली की, भविष्यात कन्नन यांनी अशा प्रकारच्या घोषणा देऊ नये. कन्नन यांनी पेरियार यांचा पुतळा हटवण्याच्या त्यांच्या घोषणेचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘लक्षावधी हिंदू त्यांच्या देवावर श्रद्धा ठेवतात. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना लक्ष्य करणे चुकीचे आहे. पेरियार यांचा पुतळा उभारून हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे.’ या प्रकरणी गुन्हा रहित करतांना न्यायमूर्ती म्हणाले, ‘पेरियार यांचा पुतळा मुद्दामहून हिंदु देवस्थानासमोर उभारणे चुकीची गोष्ट आहे. स्वतः लोकांच्या भावना भडकावायच्या आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हाही नोंदवायचा, हे न्यायालय स्वीकारू शकत नाही.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१३.१०.२०२४)