Australia Hindu Temples Vandalised : ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत हिंदूंच्या २ मंदिरांची तोडफोड आणि चोरी

शिवलिंग फोडले !

हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड (छायाचित्र सौजन्य : Australia Today)

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे २ हिंदु मंदिरांवर चेहरा झाकून आलेल्या ४ अज्ञातांनी २६ ऑक्टोबरच्या दुपारी आक्रमण आक्रमण करून तोडफोड केली. तसेच येथील मौल्यवान वस्तूंची चोरीही केली. यासह चोरट्यांनी शिवलिंग आणि शिवाच्या मूर्तींचीही तोडफोड केली. कॅनबेरा येथे प्रतिवर्षी दिवाळी जत्रेचे आयोजन केले जात असतांना हे आक्रमण झाले. ऑस्ट्रेलियातील हिंदूंच्या मंदिरांवर वाढत्या आक्रमणांंमुळे तेथील हिंदूंमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

१. ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ वृत्तपत्रातील वृत्तानुसार ४ जण काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून फ्लोररी येथील हिंदु मंदिर आणि सांस्कृतिक केंद्र येथे आले. या चौघांनी चेहरे कापडाने झाकले होते. त्यांनी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तोडले आणि आतून ४ दानपेट्या पळवून नेल्या. त्यांपैकी एक दानपेटी अनुमाने२०० किलो वजनाची होती. यात सहस्रो डॉलरच्या नोटा होत्या.

२. मंदिराचे उपाध्यक्ष तरुण अगस्ती म्हणाले की, आम्ही या घटनेने अत्यंत दु:खी आणि व्यथित झालो आहोत. हा आमची मंदिरे आणि समाज यांचा घोर अपमान आहे. आम्ही आमच्या समुदायाला आश्‍वासन देऊ इच्छितो की, आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्थानिक अधिकार्‍यांसमवेत काम करत आहोत, जेणेकरून दोषींना शिक्षा मिळू शकेल. ही घटना केवळ आपल्या हिंदु समुदायावरच परिणाम करत नाही, तर कॅनबेरातील विविध समाजांतील परस्पर आदर, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता यांच्या मूल्यांवरही आक्रमण करते.

श्री विष्णु शिव मंदिराची तोडफोड (छायाचित्र सौजन्य : Australia Today)

३. ‘ऑस्ट्रेलिया टुडे’च्या वृत्तानुसार, या मंदिरातील तोडफोडीनंतर आक्रमणकर्ते दुपारी २ वाजता श्री विष्णु शिव मंदिराकडे निघाले. त्या वेळी मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक  जेवणासाठी बाहेर गेले होते. आक्रमण करणार्‍यांनी मंदिराचा मुख्य दरवाजा लोखंडी सळीने  तोडून आत प्रवेश केला. त्यांनी मंदिराच्या स्वागतकक्षाची तोडफोड केली आणि दानपेट्या हातोड्याच्या साहाय्याने फोडून रोख रक्कम लुटली. त्यांनी मंदिराच्या गाभार्‍यातही घुसून तेथील कपड्यांचे कपाट आणि वसंत मंडप यांची हानी केली. या वेळी त्यांनी मंदिरातील शिवलिंगही फोडले.

४. या संदर्भात श्री विष्णु शिव मंदिराचे अध्यक्ष थामो श्रीधरन् यांनी सांगितले की, मी ऑस्ट्रेलियाच्या सरकारला आवाहन करू इच्छितो की, त्यांनी आमची मंदिरे आणि समुदायाची सुरक्षा, यांसाठी आम्हाला आवश्यक ते सहकार्य करावे.

५. या आक्रमणकर्त्यांनी वापरलेल्या वाहनाला क्रमांक होता; मात्र हे वाहन चोरीचे होते कि वाहन क्रमांक चुकीचे होते ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस या दोन्ही घटनांचे अन्वेषण करत आहेत.

यापूर्वी ऑस्ट्रेलियात खलिस्तान्यांकडून अनेक मंदिरांवर झाली आहेत आक्रमणे !

वर्ष २०२३ मध्येही ऑस्ट्रेलियात हिंदूंच्या ५ मंदिरांवर आक्रमण झाले होते. ब्रिस्बेनमधील लक्ष्मी नारायण मंदिरावर खलिस्तानी समर्थकांनी आक्रमण केले होते. मेलबर्नमधी अल्बर्ट पार्कमध्ये असलेल्या इस्कॉन मंदिराच्या भिंतींवर ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ असे लिहिले होते.

व्हिक्टोरियातील करम डाउन्स येथील श्री शिव विष्णु मंदिरातही तोडफोड करणार्‍यांनी लक्ष्य केले आणि मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिरात भारतविरोधी चित्रे रंगवण्यात आली. ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा’ अशा शब्दांत सिडनीतील स्वामीनारायण मंदिराचीही विटंबना करण्यात आली. खलिस्तानी समर्थकांनी मेलबर्नमधील कालिमाता मंदिरात कट्टर हिंदु गायक कन्हैया मित्तल यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित न करण्याची धमकी दिली होती.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

ऑस्ट्रेलियातील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचा इतिहास पाहिला, तर खलिस्तान्यांचेच हे कृत्य असल्याचे लक्षात येते ! हिंदूंच्या सणांच्या वेळी खलिस्तानी जाणीवपूर्वक हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांचे नाक दाबण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !