भोकर (ता. श्रीरामपूर) गावातील श्री रेणुकामाता मंदिरामध्ये दानपेटीची चोरी !

यापूर्वीही मंदिरामध्ये ३ वेळा चोरी !

श्रीरामपूर – तालुक्यातील भोकर गावामधील जागृत देवस्थान श्री रेणुकामाता मंदिरामध्ये गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दानपेटीची चोरी झाल्याचे उघडकीस आले. मंदिराच्या मुख्य दरवाजा बाहेरील लोखंडी शटरचे कुलूप तोडून चोरांनी मंदिरामध्ये प्रवेश केला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञातांनच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरांचा आणि दानपेटीचा शोध घ्यावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी भोकरचे सरपंच प्रताप पटारे, उपसरपंच संदीप गांधले, सदस्य आणि ग्रामस्थ भाविकांनी दिली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? चोरांना गजाआड करणे पोलिसांचे कर्तव्यच आहे ! – संपादक)

मंदिरामध्ये लोकवर्गणीतून सीसीटीव्ही लावलेले आहेत. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून मध्यरात्री २ वाजता २ चोर मंदिरामध्ये शिरून दानपेटी उचलून नेत असल्याचे दिसले. सीसीटीव्हीमध्ये स्वतःची ओळख लपवण्यसाठी चोर भिंतीच्या कडेने पेटी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून चोरांना मंदिराची पहाणी केली होती, असा अंदाज बांधला जात आहे.

मंदिरामध्ये यापूर्वीही दानपेटीची चोरी !

मंदिरातील जुनी दानपेटी चोरांनी चोरली होती. ती गावतळ्याकडे नेऊन तिथे फोडून आतील रक्कम घेऊन पसार झाले होते. या घटनेनंतर १२ वर्षांपूर्वी अद्ययावत अशी दानपेटी बसवण्यात आली. तीही दानपेटी चोरांनी गावतळ्याच्या बाजूला चोरून नेली; परंतु ती दानपेटी फोडण्यात अपयश आल्याने ती तशीच टाकून चोर पसार झाले. काही वर्षांपूर्वी हीच दानपेटी पुन्हा चोरांनी मंदिराबाहेर ओढत आणली. तेथे दानपेटीच्या खालच्या बाजूने कट करून आतील रक्कम लंपास करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरांमध्ये वारंवार चोर्‍या होणे, हे पोलिसांची अकार्यक्षमता दशर्वते ! मंदिरांमध्ये वारंवार चोर्‍या होत असतांना त्या रोखू न शकणे, पोलिसांना लज्जास्पद !