RSS On Hindu Unity : हिंदू जात, भाषा किंवा प्रदेश यांच्या आधारावर विभागले गेले, तर विनाश होईल !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

मथुरा (उत्तरप्रदेश) – समाज, जात आणि भाषा यांत भेद केला, तर आपला (हिंदूंचा) नाश होईल. त्यामुळे एकजूट आवश्यक आहे. हिंदु समाजाचे ऐक्य लोककल्याणासाठी आहे. ते सर्वांना आनंद देईल. हिंदूंना तोडण्यासाठी शक्ती कार्यरत आहेत. त्यांना चेतावणी देणे महत्त्वाचे आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे केले. ते ‘दीनदयाळ उपाध्याय गाय विज्ञान संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रा’च्या परिसरात आयोजित संघटनेच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या २ दिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच केलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागलो गेले, तर मारले जाऊ) या वक्तव्यासंदर्भात होसबाळे बोलत होते. ‘हिंदु समाज जर एकजूट राहिला नाही, तर आज-कालच्या भाषेत ‘बटेंगे तो कटेंगे’ स्थिती उद्भवू शकते’, असे ते म्हणाले.

सरकार्यवाह होसबाळे पुढे म्हणाले की,

१. हिंदूंची एकजूट लोककल्याणासाठी आहे. ती कायम राखणे आणि अन्य लोकांचेही भले करण्यासाठी हिंदू एकजूट रहाणे आवश्यक आहे. हे केवळ बोलून होणार नाही, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, आचरणातही आणावे लागेल, यात दुमत नाही.

२. अनेक ठिकाणांहून धर्मांतराची प्रकरणे समोर येत आहेत. श्री दुर्गापूजा आणि श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली होती. हिंदु समाजाने स्वतःचे रक्षण करून संघटित राहिले पाहिजे.

३.  वक्फ कायद्याला मुसलमानांचाही विरोध !

संसदेत वक्फ कायद्याच्या संदर्भात आणलेल्या विधेयकावरील प्रश्‍नावर सरकार्यवाह म्हणाले की, फार पूर्वी सिद्ध केलेल्या वक्फ अधिनियमात २०१३ मध्ये केलेल्या दुरुस्तीमुळे भारतातच एक प्रकारे स्वंतत्र शाखा स्थापन झाली होती. यात सक्षम अधिकार्‍यालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. केवळ हिंदूंचाच या विधेयकाला विरोध आहे, असे नाही, तर मुसलमान समुदायातील बर्‍याच व्यक्तींनीही याला विरोध केला आहे. वक्फद्वारे केले जात असलेले अत्याचार आणि अन्याय यांमुळे त्रस्त असलेला हाच समाज आहे.

४.  बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण मिळायला हवे !

बांगलादेशच्या संदर्भात भारत सरकारने सर्व समाजांना साहाय्य केले. तेथील हिंदु समाज तेथेच राहील, असाही संघाचा विश्‍वास होता. पळून जाऊ नये, खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तेथे हिंदू रहात असेल, तर त्याला संरक्षण मिळायला हवे. बांगलादेशातही संघाच्या विचारांशी संबंधित लोक एकमेकांना साहाय्य करत आहेत.

५. ‘ओटीटी’वर सेन्सॉर बोर्ड हवा !

चित्रपटांमध्ये जसा सेन्सॉर बोर्ड असतो तसा ‘ओटीटी’वर (ओटीटी म्हणजे ‘ओव्हर दी टॉप’. अ‍ॅपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आधी कार्यक्रम पहाणे) कायदा आणायला हवा. याचाही सरकारने विचार करावा. मुलांच्या हातात भ्रमणभाष संच आले आहेत. गोष्टी मनाला चंचल बनवतात आणि वाईट सवयी लागतात. यावरही काही नियंत्रण असायला हवे. यापासून मुलांचे संरक्षण केले पाहिजे.

६. श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरण न्यायालय सोडवेल !

श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरण न्यायालयात आहे. मला आशा आहे की, न्यायालय हा प्रश्‍न लवकर सोडवेल. अयोध्या प्रश्‍न सुटला. प्रत्येक खटला सारख्याच पद्धतीने हाताळणे आवश्यक नाही. न्यायालयावर विश्‍वास ठेवा. हिंदू समाज आवाज उठवत आहे, आम्ही त्यांच्यासमवेत आहोत.