‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. गुरुदास गौडा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१७.१०.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. ‘चि. गुरुदास सतत हसतमुख आणि उत्साही असतो.
२. गुरुदास प्रत्येकाशी पटकन जुळवून घेतो. तो मंगळुरू सेवाकेंद्रात येणारे साधक आणि पाहुणे यांच्याशी स्वतःहून बोलतो अन् त्यांना साहाय्य करतो.
३. सेवाभाव
तो ‘सेवाकेंद्रात शिबिर असेल, तर साधकांच्या निवासाची व्यवस्था करणे, गाडीतून साहित्य उतरवणे, वाहन आणि आश्रम यांची स्वच्छता करणे’, अशा सेवा करण्यासाठी साहाय्य करतो. तो ‘सेवा परिपूर्ण कशी करायची ?’, याचे चिंतन करतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो. सेवाकेंद्रातील एखादे उपकरण बिघडले, तर गुरुदास नेतृत्व घेऊन ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो.
४. चुकांविषयीची संवेदनशीलता
गुरुदासला कोणीही त्याची चूक सांगितली, तर तो ती चूक लगेच स्वीकारतो. गुरुदासचा भाऊ चरणदास (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १० वर्षे) याच्याकडून एखादी चूक झाली, तर गुरुदास लगेच त्याला त्याची चूक सांगतो.
५. गुरु आणि संत यांच्याप्रतीचा भाव
कोणी गुरूंची महानता सांगत असेल, तर गुरुदासची भावजागृती होते. एकदा गुरुदासच्या वाढदिवसाच्या दिवशी पू. रमानंदअण्णा (गुरुदासचे वडील पू. रमानंद गौडा, सनातनचे ७५ वे संत, वय ४७ वर्षे) हे पू. राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या संत, वय ८७ वर्षे) यांना ‘गुरु आमची कशी काळजी घेतात ?’, याविषयी सांगत होते. तेव्हा गुरुदासची पुष्कळ भावजागृती होत होती. तो नमस्काराच्या मुद्रेत उभा राहून संतांशी बोलत होता.’
– सौ. मंजुळा रमानंद गौडा (कु. गुरुदास याची आई, वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४३ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (८.६.२०२३)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.