आईपणाचे दायित्व !

आईचे महत्त्व एवढे आहे की, त्याविषयी असे म्हणतात, ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी !’ त्रैलोक्याचे स्वामीत्व मिळाले, तरी आईविना सर्व व्यर्थ आहे. ‘आई’ प्रत्येकाच्या जीवनातील अशी व्यक्ती आहे, जिची जागा कधीच कुणीच घेऊ शकत नाही; परंतु या कलियुगाचा परिणाम इतका घोर आहे की, या आईचे मन आणि हृदय हे अनाकलनीय किंवा कल्पनेच्या पलीकडील झाले आहे. एका ‘व्हिडिओ’त असे दिसते की, केवळ प्रसिद्धीसाठी किंवा काहीतरी वेगळे करण्याच्या नादात एक आई तिच्या लहान मुलाला घेऊन विहिरीवर बसली आहे. लहान मुलगा विहिरीच्या आतल्या बाजूला लोंबकळत आहे आणि आई गाणे म्हणत हातवारे करत आहे. मुलाला एकदा एका हाताने, एकदा दुसर्‍या हाताने धर-सोड करत आहे. हा व्हिडिओ पहाणार्‍याच्या काळजाचाही एक क्षण ठोका चुकतो. ‘ही ‘आई’च आहे ना ?’, असा प्रश्न मनात येतो. बाळ चौरंगावर चढत असतांनाही आई काही अंतरावर हात धरून असते, पडले तर पकडता यावे म्हणून. इथे तर चक्क ‘विहीर’ आहे. मन आणि बुद्धी या ठिकाणी स्तब्ध होते !

देवानंतर सर्वप्रथम कुणाला नमस्कार करावा, तर तो ‘आई’ला असे सांगितले आहे. व्यक्ती कितीही मोठी झाली, तरी आईचे चरण हे नेहमीच वंदनीय आहेत. कौसल्येचा राम, देवकीचा कृष्ण आणि ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, त्यांच्या चरणी ही वसुंधरा नेहमीच कृतज्ञ आहे. इंग्रज सैन्याचा प्रतिकार करतांना झाशीची राणी तिच्या मुलाला पाठीवर बांधून घोड्यावर स्वार झाली होती. या सगळ्या मातांच्या ठिकाणी ना कुठला स्वार्थ होता, ना प्रसिद्धीचा हव्यास. त्यांच्या ठायी असलेल्या मातृत्वाने त्यांचे नाव आज आहे आणि जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत रहाणार आहे.

व्यक्ती ठेच लागली की, प्रथम ‘आई ग’ म्हणते. ‘आई’ त्या जन्मलेल्या जिवाला आकार देते, घडवते. एका मालिकेत म्हटले होते, ‘आई म्हणजे कमरेवर हात नसलेली; पण कार्यमग्न विठाईच, लेकरांसाठी जिला भगवंताने धाडले आहे, जी देवाला उत्तरदायी आहे’, अशी आईची महती वर्णावी तेवढी थोडी आहे. वरील प्रसंग पाहिला, तर याविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अशी स्थिती का निर्माण झाली ? येथील आईचे रूप पाहून थेट ‘देवा’चीच आठवण होते.

आज आईच्या ‘करिअर’साठी मुलांचे निरागस बालपण तिच्या प्रेमाला पारखे होत आहे. काही बाळांना त्यांचे हक्काचे दूधही मिळत नाही. अशा एक ना अनेक ‘आई’पणाच्या तर्‍हा सध्या समाजात निर्माण झाल्या आहेत. ‘आईपण’ ही देवाने दिलेली पुष्कळ मोठी देणगी आहे. ‘आई’ शब्दच निश्चिंत करणारा असतो. कलियुगातील ‘आई’ने तिचे नाते निभावण्यासाठी हे सर्व लक्षात घेऊन स्वतःतील आईपण दायित्वाने निभावले पाहिजे !

– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी