पुणे – कोयत्याचा धाक दाखवत बोपदेव घाटामध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आलेल्या तरुणीला ‘मनोधैर्य’ योजनेतून ५ लाख रुपयांची हानीभरपाई मिळणार आहे. ‘मनोधैर्य’ योजनेतून हानीभरपाई मिळावी म्हणून तरुणीने ‘विधी सेवा प्राधिकरणा’कडे अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर अर्जाला केवळ ९ दिवसांमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
कोंढव्यातील ‘टेबल पॉईंट’ परिसरात ३ ऑक्टोबरच्या रात्री तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेल्यावर तेथे आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत २ जणांना अटक केली असून तिसर्या आरोपीचा शोध चालू आहे. हानीभरपाई रकमेतील २५ टक्के रक्कम रोख स्वरूपात, तर ७५ टक्के रक्कम १० वर्षांसाठी तिच्या नावे अधिकोषामध्ये मुदतठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. त्यातून येणार्या व्याजातून ती पुढील उपचार घेऊ शकते.
‘मनोधैर्य योजना’ म्हणजे काय ?
अत्याचार झालेले बालक किंवा महिलेचे पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य योजना’ चालू करण्यात आली. या योजनेंतर्गत अत्याचार झालेल्या महिलेला ३० सहस्र रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्यात येते. ‘विधी सेवा प्राधिकरणा’च्या माध्यमातून या योजनेची कार्यवाही करण्यात येते.