संकष्टी चतुर्थीदिनी सहस्रो भाविकांनी श्री क्षेत्र ओझर (पुणे) येथील श्री विघ्नहराचे घेतले दर्शन !

देवस्थानात आरती करतांना भाविक

पुणे – अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे आदींच्या शुभहस्ते ‘श्रीं’ना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या निमित्त महाआरती करण्यात आली. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत रांगेत अनुमाने ५० सहस्र भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७ आणि दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८ वाजता नियमित पोथीवाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता श्रींना नैवेद्य दाखवून भाविकांना ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने विघ्नहर मंदिरात फुलांची आरस, विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता, तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. येणार्‍या भाविकांसाठी मंदिरात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नियमित हरिपाठ आणि हरिकीर्तन झाले.