कोंढवा येथे वाहतूककोंडी सोडवणार्‍या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की !

पुणे – कोंढवा येथील शिवनेरीनगर परिसरात वाहतूककोंडी झाल्याने वाहतूक पोलीस ती सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. या भागात महेश लोणकर वाहनचालकांना धाक दाखवून त्या भागातील रहिवाशांना शिवीगाळ करत होता. याची माहिती मिळताच पोलीस शिवनेरीनगर परिसरात गेल्यावर पोलिसांना पहाताच लोणकर यांच्या पत्नीने महेश लोणकर यांच्याकडे असलेला कोयता लपवला. पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. (कायद्याचे भय न उरल्याने समाजात अशा घटना वारंवार घडत आहेत, हे दुर्दैवी ! – संपादक) त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणणे, बेकायदा शस्त्र बाळगणे यांसाठी लोणकर यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पळून गेलेल्या लोणकर दांपत्याचा पोलीस शोध घेत आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. थोरात घटनेचे अन्वेषण करत आहेत.