(‘टास्क फोर्स’ (Task Force) म्हणजे एखादे विशिष्ट काम करण्यासाठी सिद्ध केलेली समिती किंवा पथक)
सावंतवाडी – संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील १२ गावे येथे वृक्षतोड करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या क्षेत्रात अवैधरित्या होणार्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समिती’ सिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशान्वये या समितीमध्ये महसूल, वन आणि पोलीस या विभागांच्या अधिकार्यांचा समावेश असणार आहे. सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम या समितीचे अध्यक्ष असून उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी तहसीलदार, तसेच दोडामार्ग, सावंतवाडी आणि आंबोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अन् सावंतवाडी पोलीस निरीक्षक हे सदस्य असणार आहेत.
या समितीद्वारे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्रात संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, प्रचार – प्रसिद्धी आणि प्राप्त तक्रारी यांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा प्रती महिना आढावा घेतला जाणार आहे.
‘खासगी मालकीच्या किंवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास आल्यास जनतेने गावातील पोलीस पाटील, वनरक्षक, तलाठी यांपैकी कुणालाही तातडीने कळवावे. जेणेकरून वन विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
दोडामार्ग तालुक्यात लाकडांचा अवैध साठा सापडला
२ लाकूड गिरण्यांवर कारवाई
दोडामार्ग – तालुक्यातील झोळंबे दशक्रोशीमध्ये ‘पर्यावरण संवेदशील क्षेत्र’ (इको सेन्सिटिव्ह झोन) लागू करण्यात आले आहे. असे असले, तरी या परिसरात अवैधरित्या वृक्षतोड चालू असून वृक्षतोडीनंतर लाकडाचा साठा तालुक्यातील काही लाकूड गिरण्यांमध्ये (सॉ मिलमध्ये) केला जात असल्याची तक्रार वन विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार साहाय्यक वनसंरक्षक वैभव गोराटे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने मणेरी येथील ‘आशापुरा सॉ मिल’ आणि शहरातील धाटवाडी येथील ‘सातेरी सॉ मिल’ या लाकूड गिरण्यांची तपासणी केली. या वेळी पथकाला अवैध लाकूड साठा सापडला. त्यामुळे दोन्ही लाकूड गिरण्यांना टाळे ठोकून (सील करून) मालकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.