पुणे – सायबर चोरटे विविध क्लृप्त्या वापरून फसवणूक करत आहेत. एका दिवसात सायबर चोरट्यांनी ९ जणांची ३ कोटी ३५ लाख ३ सहस्र १७७ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बिबवेवाडी, चंदननगर, हडपसर, सहकारनगर या पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील ३४ पैकी ८ पोलीस ठाण्यांत एकाच दिवशी फसवणुकीचे ९ गुन्हे नोंद झाले आहेत. कुशल मनुष्यबळाच्या समवेत तांत्रिक यंत्रणेच्या अभावामुळे पोलिसांना गुन्ह्याचे अन्वेषण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत, तसेच सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात जनजागृतीचाही अभाव आहे. ‘इंडिया फायनान्स ऑथॉरिटी’कडून बोलत असल्याचे सांगून, तसेच शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने, शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवणे आदी प्रकारे सायबर चोरटे फसवणूक करत आहेत. (अल्प कालावधीत अधिक पैसे मिळवण्याच्या मोहापायी जनता अशा आमिषांना भुलत आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या गुन्हेगाराला पकडण्याच्या मर्यादेमुळे सायबर चोरट्यांचे फावत आहे, ही स्थिती चिंताजनक आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका :पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे सायबर चोरट्यांचा सुळसुळाट होणे हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! |