देवतांना घातले सार्वजनिक साकडे
कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्पाला कुडचिरेवासियांचा विरोध
डिचोली, २० ऑक्टोबर (वार्ता.) – कुडचिरे येथील श्री बाराजण देवस्थान परिसरात सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या वतीने सुमारे ४५ सहस्र चौ.मी. भूमीत कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी भूमी संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे गावचे पर्यावरण, जलस्रोत, नदी, नाले यांचा विद्ध्वंस होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हा प्रकल्प नकोच, अशी ठाम भूमिका कुडचिरेवासियांनी घेतली आहे. प्रकल्पाच्या विरोधात २० ऑक्टोबर या दिवशी ग्रामस्थांनी श्री बाराजण देवस्थान ते श्री सातेरी केळबाई मंदिरापर्यंत जागृती फेरी काढली. ‘आम्हाला कचरा प्रकल्प नको’, अशा घोषणा असलेले फलक ग्रामस्थांनी हातात घेतले होते. या आंदोलनात स्थानिक पंचायतीच्या आजी-माजी सदस्यांनी सहभाग घेतला.
ग्रामस्थ प्रसाद उमर्ये यांनी ग्रामस्थांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आता एकसंघ रहाण्याची आवश्यकता व्यक्त केली. माघार न घेता प्रसंगी लढा देण्यास सज्ज रहाण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिक यांनी प्रकल्पाच्या विरोधात लढा देण्यासाठी एकजूट दाखवली. आमच्या जलस्रोतांवर आलेले संकट दूर करण्याचे साकडेही ग्रामदेवतेला घालण्यात आले. यापूर्वी ऑगस्ट मासाच्या शेवटच्या आठवड्यात बाराजण, कुडचिरे येथे या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणालाही ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शवला होता.
थिवी ग्रामसभेत खासगी विद्यापीठ उभारण्यास विरोध
म्हापसा, २० ऑक्टोबर – थिवी येथील ग्रामसभेत पुणेस्थित खासगी विद्यापीठ प्रकल्पाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. या प्रकल्पाला विरोध करणारा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. हा प्रकल्प येथील कोमुनिदाद (पोर्तुगीजकालीन ग्रामस्थांची संस्था) भूमीतील २ लाख चौरमीटर क्षेत्रात उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा पर्यावरणावर, तसेच गावाच्या जनसांख्यिकीय संरचनेवर नकारात्मक परिणाम होईल, असे कारण ग्रामस्थांनी मांडले. यामुळे गावातील नैसर्गिक संपदा नष्ट होईल आणि मूलभूत सुविधांवरही ताण पडेल, असे मत ग्रामस्थांनी मांडले. वेळप्रसंगी या प्रकल्पाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचीही चेतावणी ग्रामस्थांनी दिली. या ग्रामसभेला ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते, तसेच त्यातील काही हातात प्रकल्पाच्या विरोधातील फलक घेऊन आले होते. स्वतःच्या स्वार्थासाठी कोमुनिदादचे गावकर गावाचे अहित करत आहेत, असाही आरोप करण्यात आला.
जागतिक शांतता विद्यापिठाने थिवी येथील २ लाख चौरस मीटर भूमीवर अभियांत्रिकी, सागरी अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान व्यवस्थापन अभ्यास, कला, पत्रकारिता, सार्वजनिक धोरण इत्यादी विषयांचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शैक्षणिक संकुल उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने हे क्षेत्र गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून घोषित केले होते.
‘मेगा प्रलक्पां’ना पंचायत क्षेत्रात अनुमती नाही ! – वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये पंचायतीच्या ग्रामसभेत निर्णय
फोंडा – गावची संस्कृती, हिरवाई आणि पर्यावरण संतुलन सांभाळणे आवश्यक आहे. यामुळे पंचायत क्षेत्रात कुठेच ‘मेगा प्रकल्पां’ना अनुमती न देण्याचा ठराव वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. सरपंच हर्षा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली.
ग्रामसभेत प्रारंभी कुंकळ्ये गावचे रहिवासी शिवदास नाईक यांनी कुंकळ्ये गावात भूखंड पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले आणि याला पंचायतीने अनुमती न देण्याचे आवाहन केले.
नवीन प्रादेशिक आराखडा सिद्ध करण्यासाठी लोटली येथे निदर्शने
मडगाव – गोव्यातील भूमीचे संवर्धन करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. भूमीच्या संवर्धनासाठी सरकारने त्वरित नवीन प्रादेशिक आराखडा सिद्ध करावा, अशी मागणी लोटली येथील ग्रामस्थांनी लोटली येथे महामार्गाजवळ एकत्र येऊन एका निदर्शनाद्वारे केली. या वेळी ‘आप’चे वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा, ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस आदींची उपस्थिती होती.
भूमींचे व्यवहार करतांना सरकार लोकांचे म्हणणे ऐकून घेत नाही. राज्यात डोंगरफोड मोठ्या प्रमाणात चालू आहे. लोकांना गोव्यात येणार्या प्रकल्पांसाठी प्रादेशिक आराखडा आवश्यक आहे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.