गोव्यातील मंदिरांमध्ये चोरीच्या वाढत्या घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २० ऑक्टोबर (वार्ता.) – चोरट्यांनी गोव्यातील मंदिरांना लक्ष्य केले आहे. हल्लीच्या काळात पेडणे, डिचोली, फोंडा, केपे आदी तालुक्यांतील मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसवण्याबरोबरच पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

पेडणे तालुक्यात कोरकणवाडा, हरमल येथे जागृत श्री शेणेश्वर देवस्थानमध्ये चोरी होऊन मंदिरातील समई आणि अन्य साहित्य चोरीस गेले. १६ ऑक्टोबरच्या रात्री ही चोरी झाली आहे. पेडणे तालुक्यात मधलामज, मांद्रे येथील श्री हनुमान मंदिरातील गर्भगृहामध्ये प्रवेश करून चोरट्यांनी १ लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र येथून संशयित विनोद रामा पाटेकर याला कह्यात घेतले आहे. केरी, पेडणे येथील श्री आजोबा मंदिरातही चोरीची घटना घडली आहे. काणकोण येथे गोमंतक मंदिर महासंघ आणि स्थानिक मंदिरांचे प्रतिनिधी यांनी शासन अन् पोलीस यांची नुकतीच भेट घेऊन मंदिरातील चोरीच्या घटनांना तातडीने आळा घालण्याची मागणी केली आहे. गोव्यात इतरत्रही अनेक मंदिरांमध्ये हल्लीच्या काळात चोरीच्या घटना घडल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये साळगाव, केपे, वेर्णा, मुरगाव, फोंडा आदी ठिकाणी मिळून एकूण ६ ठिकाणी, वर्ष २०२३ मध्ये नगरगाव, लाडफे, कळंगुट, अन्साभाट, पर्रा-म्हापसा, पीर्ण-बार्देश, पेडणे, हरमल, केपे, काणकोण, फोंडा आदी मिळून एकूण १४ ठिकाणी आणि वर्ष २०२४ मध्ये वाळपई, डिचोली, कळंगुट, म्हापसा, मांद्रे, फातोर्डा, सांगे, काणकोण आणि फोंडा मिळून एकूण ११ ठिकाणी मंदिरांमध्ये चोर्‍या झालेल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांत गुन्हे नोंद झालेले आहेत.

संपादकीय भूमिका 

हिंदूबहुल देशात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित ! मंदिरातील चोरीच्या वाढत्या घटना पहाता चोरांना पोलिसांचा कोणताच धाक वाटत नाही, हेच लक्षात येते !