Chief Justice Chandrachud On Ayodhya : अयोध्‍येचा निर्णय देण्‍यापूर्वी मी देवासमोर बसलो होतो आणि देवानेच मला मार्ग दाखवला !

सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली माहिती

सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड

पुणे – न्‍यायालयात काम करत असतांना कित्‍येक वेळा अशी प्रकरणे समोर येतात जी सोडवणे अवघड असते. माझी अशीच काहीशी स्‍थिती अयोध्‍या प्रकरणाचा निकाल देतांना झाली होती. अयोध्‍या खटला माझ्‍यापुढे चालू होता. ३ महिने आम्‍ही त्‍यावरील सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कुणी सोडवू शकले नव्‍हते, तेच प्रकरण आमच्‍या पुढे येऊन ठेपले होते. त्‍या वेळी ‘यातून मार्ग कसा शोधायचा ?’, असा प्रश्‍न आम्‍हाला पडला होता. मी या खटल्‍याचा निकाल देण्‍यापूर्वी देवाची पूजा करतांना देवाकडेच साहाय्‍य मागितले होते.

मी प्रतिदिन सकाळी देवाची पूजा करतो, तशीच पूजा त्‍या दिवशीही करत होतो. मी भगवंतापुढे बसलो आणि भगवंताला म्‍हणालो, ‘‘आता तुम्‍हीच मला मार्ग शोधून द्या.’’ तुमचा यावर विश्‍वास असेल; पण तुमची श्रद्धा असेल, तर देव तुम्‍हाला मार्ग शोधून देतो. देवाने मलाही मार्ग दाखवला, अशी माहिती सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना दिली. ९ नोव्‍हेंबर २०१९ या दिवशी या प्रकरणावर तत्‍कालीन सरन्‍यायाधीश रंजन गोगोई, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस्. अब्‍दुल नजीर या ५ न्‍यायाधिशांच्‍या खंडपिठाने निकाल दिला होता.

चंद्रचूड म्‍हणाले की, मी देशभर सर्वत्र भ्रमंती केली आहे. अनेक ठिकाणी गेलो आहे, तिथली मंदिरे पाहिली आहेत; परंतु कन्‍हेरसरचे श्री यमाईदेवीचे मंदिर मला अतिशय आवडते. इतके सुंदर मंदिर मी देशात कुठेही पाहिलेले नाही. पूर्वजांच्‍या पुण्‍याईमुळे मी इथवरचा प्रवास करू शकलो आणि श्री यमाईदेवीच्‍या कृपेने मी भारताचा सरन्‍यायाधीश झालो. येथील लोकांनी माझा सत्‍कार केला, त्‍याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.