धर्मविरोधी षड्‍यंत्र !

सीता हरण प्रसंग (प्रतीकात्मक चित्र )

काही वर्षांपासून दसर्‍यासारख्‍या दिवशी ‘भाऊ असावा, तर रावणासारखा’ असा विचार काही जण पसरवत आहेत. सध्‍या चालू असलेल्‍या बलात्‍काररूपी विकृतीच्‍या घटनांवरून ‘सीतेला रावणाने स्‍पर्शसुद्धा केला नाही’, अशा पद्धतीचे रावणरूपी दुष्‍प्रवृत्तींचे उदात्तीकरण करणारे, सत्‍याशी विपरित असलेले संदेश सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित केले जात आहेत. विशेष म्‍हणजे हिंदूंकडूनच हे संदेश राजरोसपणे प्रसारित होत आहेत आणि युवा पिढीचे मन कलुषित करत आहेत. रावणाचे श्रीरामांसमवेत समोरासमोर युद्ध करण्‍याचे धाडस न झाल्‍याने त्‍याने कपटाने माता सीतेचे हरण केले, म्‍हणजे येथेच रावणाच्‍या उदात्ततेचा बुरखा गळून पडतो; परंतु सनातन धर्माला संपवण्‍याचे षड्‌यंत्र काही समाजविघातक शक्‍ती रचत आहेत. त्‍यामुळेच ते अशा प्रकारे सनातन धर्माच्‍या विरोधात टीका-टिपणी करतांना आढळतात.

‘शूर्पणखेच्‍या अपमानाचा सूड घेण्‍यासाठी म्‍हणून रावणाने सीताहरण केले’, असा युक्‍तीवाद करून ‘रावण पुष्‍कळच आदर्श भाऊ होता’, असे भासवले जाते. वाल्‍मिकी रामायणातील उत्तरकांडामध्‍ये रावणाने विश्‍वविजयाच्‍या नादात बहीण शूर्पणखेच्‍या नवर्‍याची हत्‍या करून तिला विधवा केले, याविषयी संदर्भ आहे. रावण हा स्‍त्रीलंपटच होता, हे तो स्‍वतःच मान्‍य करतो. स्‍त्रीकडे केवळ भोगविलासाची वस्‍तू म्‍हणूनच तो बघत असे. सीतेच्‍या अपहरणाच्‍या वेळी तो तिला म्‍हणतो, ‘‘मी आजपर्यंत अनेक स्‍त्रियांचे अपहरण केले आहे.’’ ‘रावणाने सीतेचे अपहरण करूनही तिला त्‍याच्‍या वासनेने स्‍पर्श केला नाही’, हे गर्विष्‍ठपणे सांगितले जात आहे; परंतु ‘तू कोणत्‍याही परस्‍त्रीला मनाविरुद्ध स्‍पर्श केलास, तर तुझे शीर धडापासून वेगळे होईल’, या नलकुबेराच्‍या शापामुळे रावण पतीव्रता सीतेला तिच्‍या मनाविरुद्ध स्‍पर्श करू शकला नाही, हे खरे सत्‍य आहे.

याचे वर्णन वाल्‍मिकी रामायणाच्‍या उत्तरकांडमध्‍ये २६ व्‍या अध्‍यायात ३९ व्‍या श्‍लोकात आढळते. याशिवाय ‘रावणाने पुंजिकस्‍थलावर केलेल्‍या बलात्‍कारामुळे ब्रह्मदेवांनी रावणाला ‘कुठल्‍याही स्‍त्रीवर तिच्‍या मनाविरुद्ध बलात्‍कार केल्‍यास मस्‍तकाचे १०० तुकडे होतील’, असा शाप दिला होता. त्‍यामुळे ‘रावण सीतेवर बळजोरी करू शकला नाही’, असे रामायणात युद्धकांडातील १३ व्‍या अध्‍यायात आहे. यावरून रावणाचे उदात्तीकरण करणारे वरील संदेश किती पोकळ, असत्‍य आहेत, हेच सिद्ध होते.

हिंदूंनी प्रभु श्रीरामांचा इतिहास विसरावा, यासाठी रचण्‍यात येत असलेले षड्‌यंत्र म्‍हणजेच एकीकडे रावणाचे उदात्तीकरण चालू आहे आणि दुसरीकडे ‘श्रीराम काल्‍पनिक आहेत’, असे म्‍हणत त्‍याचे अस्‍तित्‍व नाकारले जात आहे. भारतात हिंदूंना त्‍यांचा धर्म, गौरवशाली इतिहास, संस्‍कृती आणि अध्‍यात्‍म यांपासून हेतूपूर्वक वंचित ठेवले जाते, या वस्‍तूस्‍थितीच्‍या विरोधात हिंदूंनी वैध मार्गाने आवाज उठवून विरोध करावा.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे.