मंदिरांमध्ये राजकारण्यांचे पुनर्वसन करण्याऐवजी भक्तांना नेमा !

मुंबईमधील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरातील विश्‍वस्तांचा कालावधी ३ वर्षांवरून ५ वर्षांचा करण्याचा निर्णय महिनाभरापूर्वी महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी घेतला होता. याविषयीचे सुधारणा विधेयक १६ डिसेंबर या दिवशी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पटलावर ठेवण्यात आले; परंतु या सुधारणा विधेयकामध्ये विश्‍वस्तांचा कालावधी वाढवण्यासह श्री सिद्धिविनायक मंदिरातील विश्‍वस्तांची संख्या ९ वरून १६ इतकी करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये महायुतीचे बहुमत असल्यामुळे हे विधेयक बहुमताने संमत होऊ शकेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत श्री सिद्धीविनायक मंदिराच्या ट्रस्टीमध्ये आणखी ७ विश्‍वस्तांची भर पडेल; परंतु अतिरिक्त विश्‍वस्तांची नियुक्ती ‘मंदिर व्यवस्थापनाची आवश्यकता’ म्हणून आहे कि ‘राजकारणातील अप्रसन्न मंडळीचे पूनर्वसन’ आहे, याकडे हिंदूंनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यामध्ये तथ्य असेल, तर मात्र ‘मंदिरे ही राजकीय नेत्यांचे पुनर्वसन करण्याचे स्थान नाही’, हे हिंदूंनी सरकारच्या लक्षात आणून द्यायला हवे.

श्री सिद्धिविनायक मंदिर

१. मंत्रीमंडळात शक्य नसल्याने राजकीय व्यक्तींचे अन्यत्र पुनर्वसन :

श्री. प्रीतम नाचणकर

काँग्रेसच्या काळात महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले. सिद्धीविनायक मंदिर हे त्यातीलच एक आहे. राजकारणांतील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठीच काँग्रेसने हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केले. मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर मंदिरांच्या विश्‍वस्तपदी काँग्रेस आघाडीच्या हितचिंतकांच्या नियुक्त्या केल्या. सत्तेमध्ये मंत्रीपदे न्यून पडायला लागल्यावर राज्यमंत्रीपदांची निर्मिती करण्यात आली. राज्यमंत्रीपदेही अल्प पडू लागल्यावर विविध महामंडळांच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात येत आहेत. अशा प्रकारे सहकार, आरोग्य आदी विविध क्षेत्रात राजकारण्यांचे पूनर्वसन करण्यात आले. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये राजकारणी शिरले त्या ठिकाणी पक्षीय राजकारण, त्यातून एकमेकांवरील कुरघोड्या, भ्रष्टाचार आदी प्रकार वाढले आहेत. हेच प्रकार मंदिरांमध्येही चालू झाले आहेत. मंदिरांतील पावित्र्य टिकून रहाण्याचे त्यांचे धार्मिकत्व टिकून रहाणे अत्यंत आवश्यक आहे. मंदिरे राजकारण्यांचा अड्डा झाल्यास त्यातील पावित्र्य नष्ट होईल. हा भाग हिंदूद्वेषी काँग्रेसला समजेल असे नाही. उलट काँग्रेसकडून असे प्रकार जाणीवपूर्वक केले जातील, हे हिंदू ओळखून आहेत.

२. धार्मिक व्यक्तीला मंदिरांच्या विश्‍वस्तपदी नियुक्त करण्याचा आदर्श आताच्या सरकारने दाखवावा ! :

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यावर काँग्रेसने केलेले मंदिरांचे सरकारीकरण रहित होईल, अशी हिंदूंची अपेक्षा होती; मात्र नगर येथील श्री शनैश्‍वर मंदिराचे सरकारीकरण युती सरकारच्या काळात झाले. असे होणे हिंदूंना अनपेक्षित आहे. काही मंदिरांमध्ये अनुचित प्रकार घडले. जसे की पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांतील अनेक अनुचित प्रकार चव्हाट्यावर आले; मात्र मंदिरांमधील अनुचित प्रकार रोखण्यासाठी त्यांचे सरकारीकरण हा काही त्यावर उपाय नाही. उलट सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील व्यवस्थापन सुधारण्याऐवजी मंदिरांतील अनागोंदी कारभार आणखी वाढला. काँग्रेसने जरी मंदिरांचे सरकारीकरण केले असले, तरी हिंदुत्वनिष्ठ असलेल्या महायुती सरकारने मंदिरांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी साहाय्य करणे अपेक्षित आहे. सध्या मंदिरांच्या अध्यक्षपदावरून राजकीय पक्षांमध्ये कुरघोड्या चालू आहेत. यामुळे काही मंदिरांमध्ये अध्यक्षपदाच्या नियुक्त्याही करण्यात आलेल्या नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मंदिरांतील विश्‍वस्त समितींवर अध्यक्षच नाहीत. हा मंदिरांच्या विश्‍वस्तपदांमध्ये राजकारणी घुसवण्याचा परिणाम होय. हे प्रकार बंद करून संबंधित देवतेप्रती श्रद्धा असलेल्या धार्मिक व्यक्तीला मंदिरांच्या विश्‍वस्तपदी नियुक्त करण्याचा आदर्श आताच्या सरकारने दाखवायला हवा.

३. मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी भक्तांची नेमणूक हवी ! :

मंदिरांच्या विश्‍वस्तपदी राजकारणी नेमले, तर भविष्यात मंदिरांचे स्थिती सरकारी महामंडळांप्रमाणे झाल्यास आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे हिंदू समाजानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याकडे केलेले दुर्लक्ष भविष्यात हिंदु धर्मावरील मोठा आघात ठरेल. मंदिरांच्या विश्‍वस्तपदी राजकारण्यांची नियुक्ती झाल्यास मंदिरांच्या व्यवस्थापन कारभारही राजकारण्यांचा अड्डा होईल. याचा परिणाम मंदिरांतील पावित्र्याचा र्‍हास होण्यात होईल. त्यामुळे मंदिरांमध्ये येणारे भाविक पावित्र्यापासून वंचित रहातील. असा दूरगामी दुष्परिणाम यातून संभवतो. मंदिरे ही हिंदूंची धार्मिक शक्तीपीठे आहेत. त्यांमधील पावित्र्य टिकवून ठेवण्यात विश्‍वस्तांचे योगदान महत्त्वाचे ठरते. यासाठी विश्‍वस्त हे राजकारणाशी बांधील असण्यापेक्षा भगवंताचे भक्त असण्यात हिंदु धर्माचे हित आहे. हे हिंदूद्वेषी काँग्रेसच्या लक्षात येण्यासारखे नाही. शिवसेना-भाजप यांची विचारधारा हिंदुत्वनिष्ठ विचारधारेवर चालणारे पक्ष असल्यामुळे त्यांच्याकडून हिंदूंची अपेक्षा आहे. हा अपेक्षाभंग होणार नाही, याची काळजी आताच्या सरकारने घ्यावी !

– श्री. प्रीतम नाचणकर, प्रतिनिधी, सनातन प्रभात, नागपूर (१७.१२.२०२४)