संपादकीय : कॅनडा, लॉरेन्‍स बिष्‍णोई आणि हिंदू !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबईत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्‍या करण्‍यात आल्‍यानंतर पुन्‍हा एकदा लॉरेन्‍स बिष्‍णोई नावाच्‍या गुंडाची चर्चा संपूर्ण देशात चालू झाली असतांना ती आता विदेशातही होऊ लागली आहे. ‘बाबा सिद्दीकी याला आम्‍हीच ठार मारले. अभिनेता सलमान खान याच्‍या जवळचा असल्‍याने आणि दाऊद टोळीचा माणूस असल्‍याने बाबा सिद्धीकीला आम्‍ही संपवले’, असा दावा लॉरेन्‍स बिष्‍णोई याने केला आहे. या हत्‍येच्‍या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. त्‍यांचे लॉरेन्‍स बिष्‍णोईशी संबंध असल्‍याची प्राथमिक माहिती आहे. तरीही ‘ही हत्‍या अन्‍य कोणत्‍या कारणाने झाली आहे का ?’, याचाही शोध घेतला जात आहे. अन्‍वेषण पूर्ण झाल्‍यावरच खरी माहिती समोर येईल. राजस्‍थानमध्‍ये वर्ष १९९८ मध्‍ये एका चित्रपटाच्‍या चित्रीकरणाच्‍या काळात काळविटाची शिकार केल्‍याच्‍या प्रकरणी अभिनेता सलमान खान याच्‍यावर गुन्‍हा नोंद झाला आहे. यावर खटला अद्यापही चालू आहे. लॉरेन्‍स बिष्‍णोईचे नाव पहिल्‍यांदा याच प्रकरणात सलमान खान याला ठार मारण्‍याची धमकी दिल्‍यावरून पुढे आले होते. काही मासांपूर्वीच सलमान याच्‍या मुंबईतील निवासस्‍थानावर गोळीबार करण्‍यात आला. यानंतर पुन्‍हा लॉरेन्‍सचे नाव समोर आले. बिष्‍णोई समाजामध्‍ये काळविटाला जिवापाड जपले जाते. त्‍यामुळे त्‍याची शिकार करण्‍यात आल्‍याने हा समाज सलमान खानवर चिडलेला आहे. लॉरेन्‍स बिष्‍णोई याच समाजातील असल्‍याने त्‍याने सूड घेण्‍याची धमकी दिली. एवढ्यापुरते हे प्रकरण नाही, हे येथे लक्षात घ्‍यायला हवे.

लॉरेन्‍स बिष्‍णोई

यात अनेक पैलू लपलेले आहेत. त्‍याचा परिणाम अनेक स्‍तरांवर होत आहे, हे कॅनडा आणि भारत यांच्‍यात चालू असलेल्‍या शीतयुद्धातून दिसून येत आहे. १८ जून २०२३ या दिवशी कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराजवळ खलिस्‍तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्‍जर याची हत्‍या करण्‍यात आली होती. या हत्‍येत भारताचा सहभाग असल्‍याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी केला. आता तर कॅनडाच्‍या पोलिसांनी या हत्‍येमागे लॉरेन्‍स बिष्‍णोई टोळी असल्‍याचा दावा केला आहे. ‘लॉरेन्‍स बिष्‍णोई टोळीला भारत सरकारचे समर्थन आहे’, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. या टोळीचा प्रमुख गुंड गोल्‍डी ब्रार सध्‍या कॅनडातच लपला असल्‍याचे सांगितले जाते. तेथून भारतात खंडणी वसुली करणे आणि हत्‍या करवून आणणे आदी कारवाया ही टोळी करत असते. स्‍वतः लॉरेन्‍स गुजरातच्‍या साबरमती येथील कारागृहात आहे. ‘तेथून तो सूत्रे हलवत असतो’, असा आरोप केला जातो. कॅनडाने निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या आरोपांविषयी भारताला पुरावे दिल्‍याचा दावा केला असला, तरी भारताने तो फेटाळला आहे. पाकिस्‍तानच्‍या आय.एस्.आय. या गुप्‍तचर संघटनेने मुंबईतील गुंड दाऊद इब्राहिम याला हाताशी धरून भारतात अनेक आतंकवादी कारवाया केल्‍या, अनेकांच्‍या हत्‍या घडवून आल्‍या. याला प्रत्‍युत्तर म्‍हणून भारताच्‍या गुप्‍तचर यंत्रणांनी गुंड छोटा राजन याला हाताशी धरून मुंबईतील दाऊदचे अनेक गुंड आणि हस्‍तक यांना ठार केले. नेपाळमध्‍येही दाऊदच्‍या एका मोठ्या हस्‍तकाची हत्‍या घडवून आणल्‍याचा आरोप केला जातो. यातून अशा गुंडांच्‍या माध्‍यमातून शत्रूराष्‍ट्रांत कारवाया करण्‍याचा एक समान धागा दिसून येतो. याच अनुषंगाने भारत लॉरेन्‍स बिष्‍णोईच्‍या माध्‍यमांतून कॅनडातील खलिस्‍तानी आतंकवादी आणि त्‍यांचे समर्थक यांना लक्ष्य करत असल्‍याचा आरोप कॅनडा करत आहे.

ट्रुडो यांचा राजकीय स्‍वार्थ

कॅनडाच्‍या आरोपामागेही अनेक पैलू आहेत. कॅनडामध्‍ये १७ लाख भारतीय आहेत आणि त्‍यांतही शिखांची लोकसंख्‍या अधिक असल्‍याने त्‍यांचा एक दबाव गट निर्माण झाला आहे. या गटाचे १८ खासदार आहेत. या गटाचा ट्रुडो सरकारला पाठिंबा होता. तो काही मासांपूर्वीच काढून घेण्‍यात आला. पुढील वर्षी येथे निवडणुका होणार आहेत. पुन्‍हा या गटाचे समर्थन मिळण्‍यासाठीच ट्रुडो सरकार खलिस्‍तान्‍यांना खूश करण्‍याचा प्रयत्न करत आहे. ‘त्‍यातून भारतावर आरोप केले जात आहेत’, असेही म्‍हटले जात आहे. भारताच्‍या परराष्‍ट्रनीतीमध्‍ये गेल्‍या काही वर्षांत पालट झाला असून त्‍यात अधिक बाणेदारपणा आला आहे. त्‍यातून कॅनडाच्‍या आरोपांना भारताने भीक न घालता ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे. हेच सध्‍या अपेक्षित आहे. कॅनडा त्‍याच्‍या देशात असणारे भारतविरोधी खलिस्‍तानी आणि आतंकवादी यांच्‍यावर कारवाई करत नाही, हे जगाला दिसत आहे.

त्‍यातून त्‍यांच्‍यातील अंतर्गत कलहामुळे एकमेकांच्‍या हत्‍या होत असतील, तर त्‍याला भारत कसा उत्तरदायी असणार ? जर भारतातील कुणी हत्‍या केल्‍याच असतील, तर ठोस पुरावे देणेही आवश्‍यक आहे. ‘तसे पुरावे दिलेले नाहीत’, हे भारताने सातत्‍याने सांगितले आहे. ‘भारताने विदेशात असणार्‍या भारतविरोधी लोकांना इस्रायलची गुप्‍तचर संघटना ‘मोसाद’ जशी नष्‍ट करते, तसे भारतानेही केले पाहिजे’, अशी कोट्यवधी भारतियांची अपेक्षा आहे आणि जर तेथील कुणी भारतप्रेमापोटी स्‍वतःहून असे करत असेल, तर त्‍याला भारत सरकार कसे उत्तरदायी असणार ? स्‍वतःची राजकीय पोळी भाजण्‍यासाठी ट्रुडो भारतावर आरोप करून खलिस्‍तान्‍यांची कृपा संपादन करू इच्‍छित आहेत. दुसरीकडे लॉरेन्‍स बिष्‍णोई गुंड आहे, हे जगजाहीर आहे; मात्र एखादा गुंड देशभक्‍त असू शकतो आणि तो त्‍याच्‍या परिने ‘देशसेवा’ करू शकतो.

प्रतिकार करणे महत्त्वाचे !

बाबा सिद्धीकी (मध्यभागी ) अभिनते शाहरुख खान व सलमान खान यांच्या समवेत.

बाबा सिद्धीकी हत्‍या, कॅनडाचे प्रकरण आणि लॉरेन्‍स बिष्‍णोई याच्‍यावरील आरोप हे सर्व घडत असतांना उत्तरप्रदेशातील बहराइच येथे दसर्‍याच्‍या दिवशी श्री दुर्गादेवीच्‍या मूर्तीच्‍या विसर्जन मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात मुसलमानांकडून आक्रमण करण्‍यात आले. यात दगडफेक करणार्‍या मुसलमानाच्‍या घरावरील हिरवा ध्‍वज काढून तेथे भगवा ध्‍वज फडकावणार्‍या राम गोपल मिश्रा या हिंदूची मुसलमानांनी अत्‍यंत निर्घृणपणे हत्‍या केली. याचे पडसाद लगेचच उमटले आणि संतप्‍त हिंदूंनी मुसलमानांची घरे आणि दुकाने जाळली. यातून हिंदू प्रतिकार करू लागले आहेत, हे लक्षात येते. प्रतिकार केल्‍यानेच स्‍वतःचे रक्षण होऊ शकते. वर्ष १९९२-९३ ची मुंबईतील दंगल आणि वर्ष २००२ ची गुजरात दंगल हे त्‍याचे मोठे उदाहरण आहे. या दोन्‍ही ठिकाणी दंगलीनंतर धर्मांध मुसलमानांकडून आतापर्यंत दंगल घडवली नाही, हे हिंदूंच्‍या प्रतिकाराचेच यश मानले पाहिजे, असे कुणाला वाटले, तर ते चुकीचे नाही. हिंदू कधीही स्‍वतः कुणावर धर्माच्‍या आधारे आक्रमण करत नाहीत. हिंदूंचा असा इतिहासही नाही. असे असतांनाही हिंदू आणि भारत यांच्‍यावर आक्रमणे होत आहेत. ती रोखण्‍यासाठी प्रतिकारच महत्त्वाचा आहे. हिंदूंना आणि भारतालाही हे समजू लागले आहे. हीच स्‍थिती पुढे कायम राहिली, तर देशात आणि विदेशात भारताची पत निर्माण होऊ भारताच्‍या अन् हिंदूंच्‍या वाटेला जाण्‍याचे कुणाचेही धाडस होणार नाही !

आक्रमणाचा प्रतिकार करून आक्रमणकर्त्‍यांना जन्‍माची अद्दल घडवणे, हीच खरी अहिंसा होय, हे भारताच्‍या लक्षात येणे, हा चांगला पालट !