‘बिग बॉस’ या रिॲलिटी मालिकेच्या नव्या भागाचे प्रसारण चालू झाले आहे. नुकतीच मराठीतील ‘बिग बॉस’ मालिका संपली. आता हिंदीतील मालिका चालू झाली आहे. मानसशास्त्रानुसार ‘दुसर्याच्या आयुष्यात काय चालू आहे ?’, याचे मोठे कुतूहल लोकांना असते. पूर्वी गावातील चौकात एखाद्या झाडाखाली काही मंडळींच्या होणार्या गप्पा-टप्पांचा काळ पालटला असून आता तो ‘बिग बॉस’सारख्या रिॲलिटी मालिकांमध्ये रूपांतरित झाला आहे. पूर्वीचा समाज शिक्षित नव्हता; म्हणून चौकात वायफळ गप्पा चालायच्या. असे जरी म्हटले, तरी आताचा समाज शिक्षित असूनही ‘बिग बॉस’सारखे वायफळ कार्यक्रम घराघरांत मोठ्या चवीने पाहिले जातात. काळ पालटला, तरी माणसाची अनावश्यक कुतूहलाची मानसिकता काही पालटलेली नाही, याचे उदाहरण म्हणजे ‘बिग बॉस’ कार्यक्रम !
या ‘बिग बॉस’ कार्यक्रमात काही वलयांकित कलाकार, काही सज्जन वागणारी, काही आकांडतांडव करणारी, काही देखणी, तर काही गरीब मंडळी यांना एकत्र आणले जाते. त्यांना काही दिवस बाहेरच्या जगापासून वेगळे आणि एकत्रित जीवन व्यतित करावे लागते. या काळात ते समवेत असलेल्या व्यक्तींशी कसे वागतात ? यावरून चांगले वागणार्या व्यक्तीला रोख रकमेचे पारितोषिक दिले जाते. मूळ नेदरलँड्स आणि नंतर ब्रिटन येथील मनोरंजन वाहिन्यांवर चालवण्यात आलेल्या ‘बिग ब्रदर’ कार्यक्रमाची संकल्पना समोर ठेवून भारतात हा कार्यक्रम चालू करण्यात आला आहे. आतापर्यंत हिंदीतील ‘बिग बॉस’च्या १७ मालिका पार पडल्या आहेत आणि मराठीसह आणखी ५ भाषांमध्ये हा कार्यक्रम होत असतो. या ‘बिग बॉस’ची प्रत्येकच मालिका वादग्रस्त ठरली, याला अतिशयोक्ती म्हणता येणार नाही; कारण प्रसिद्धी मिळवण्यासाठीच हा खेळ खेळला जातो. या कार्यक्रमाच्या ‘टी.आर्.पी.’चे खरे कारण म्हणजे मारामारी, वाद, खळबळजनक खुलासे आणि त्यानंतर होणारा अनावश्यक आवाज अन् शिवीगाळ ! स्पर्धा, द्वेष, मत्सर, विकृती, अश्लीलता ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. भारतीय समाजात एकेकाळी ज्या गोष्टींचे वर्णन करण्यासाठीही अनेक मर्यादा पाळल्या जात होत्या, त्या गोष्टी अशा कार्यक्रमांच्या आकर्षणबिंदू ठरल्या आहेत. स्पर्धा, द्वेष, मत्सर, विकृती, अश्लीलता अशा नकारात्मक अंगांना जीवनातून दूर लोटले गेले पाहिजे, तर त्याच गोष्टी या कार्यक्रमाद्वारे ‘स्वाभाविक’ आणि ‘सामान्य’ अशा प्रकारे रूळवल्या जात आहेत. अवगुणांनी भरलेल्या या कार्यक्रमाची दर्शकसंख्या आजच्या घडीला ३५ ते ४० कोटी इतकी असून तो भारतातील एक नावाजलेला कार्यक्रम आहे, हे भारतियांचे दुर्दैव आहे.
मानसिक आरोग्यावर परिणाम
चंडीगड विद्यापिठातील एका शिक्षकाने रिॲलिटी कार्यक्रम पहाणार्या दर्शकांच्या वागणुकीवर होणार्या परिणामांचा अभ्यास केला. यात त्याने ‘बिग बॉस’ पहाणार्या दर्शकांच्या वागणुकीत झालेल्या पालटांविषयीची माहिती असलेला अहवाल आकडेवारीसह प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार १७ ते ४५ वर्षे या वयोगटातील लोक हा कार्यक्रम पहातात. यात १७ ते २५ वर्षे वयोगटातील ४६ टक्के, २६ ते ३५ वर्षे वयोगटातील ३४ टक्के आणि ३६ ते ४५ वर्षे वयोगटातील २० टक्के लोक हा कार्यक्रम पहात असल्याचे नमूद केले आहे. यांतील ८५ टक्के लोकांना ‘बिग बॉस’ कार्यक्रमाचे व्यसन लागलेले आहे आणि ९० टक्के लोक या कार्यक्रमातील लोकांप्रमाणे वागतात. अनेक लोक स्वतःच्या आयुष्यातील घटनांचा संबंध या कार्यक्रमातील घटना आणि प्रसंग यांच्याशी जोडून त्याप्रमाणे वागत असल्याचे समोर आले आहे, तसेच ६० टक्के दर्शकांना कार्यक्रम पाहिल्यानंतर अस्वस्थता आणि निराशा जाणवते, तसेच चिंतेत भर पडते.
मनोरंजनासाठीच हे सर्वकाही चालू आहे, तर तज्ञांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ‘कॉसमॉस इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’चे संचालक डॉ. सुनील मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, ‘या कार्यक्रमाचा मोठा परिणाम दर्शक आणि सहभागी यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. शिवीगाळ आणि अपमान या गोष्टी वास्तविक जीवनात जरी वापरल्या जात असल्या, तरी प्रसिद्धीसाठी अशा कार्यक्रमांतून या गोष्टींचे सामान्यीकरण केले जाते.’’ ‘अशा प्रकारचा नकारात्मकता पसरवणारा कार्यक्रम मी पाहूच शकत नाही’, अशी प्रतिक्रियाही एका अभिनेत्रीने दिली आहे. ‘अशा कार्यक्रमांसाठी परिनिरीक्षण मंडळ हवे आणि अशा कार्यक्रमांतून दाखवण्यात येणार्या गोष्टी पूर्णपणे सत्य नाहीत आणि त्या गांभीर्याने घेतल्या जाव्यात, अशाही नाहीत. हे कार्यक्रम मनोरंजनासाठीच पाहिले जाणार असतील, तर लोकांनी कार्यक्रम पहाण्याचा स्वतःचा हेतू स्वतःलाच स्पष्ट करावा आणि कार्यक्रमातील पात्रांना स्वतःशी जोडू नये’, असा सल्ला ‘फोर्टीस हेल्थ केअर’चे मानसोपचार तज्ञ डॉ. समीर पारीख यांनी दिला आहे.
वेळ आणि मनाची एकाग्रता यांचे मूल्य जाणा !
‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: ।’ म्हणजे पहाणारा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो, या वचनानुसार आपण जे पहातो, त्याचा संस्कार आपल्या मनःपटलावर होऊन त्यानुसार वागले जाते, हे लक्षात घ्यायला हवे. ‘बिग बॉस’च्या दर्शकांच्या वयोगटाची आकडेवारी पहाता, देशाचा तरुण आणि प्रौढ वर्ग अनावश्यक कुतूहलाच्या मागे वहावत जात असल्याचे आढळते. कुठलीही गोष्ट विनामूल्य मिळत नाही. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी मूल्य असतेच. मनोरंजन करणार्या कार्यक्रमासाठी केवळ शुल्क भरावे लागते, असे नाही, तर ‘तुमचा वेळ आणि तुमची एकाग्रता’ ही त्याची खरी किंमत असते, हे लक्षात घ्यायला हवे.
मालिका विश्व आणि सामाजिक माध्यमे ही भारतातील तरुण पिढीचे लक्ष नको त्या गोष्टींकडे नेण्यात पूर्णतः यशस्वी ठरली आहेत. शेजारच्या गल्लीत एखाद्या आतंकवाद्याच्या समर्थनाचे फलक लागले, शेजारच्या घरातील मुलीला धर्मांधाने उचलून नेले, तर त्याविषयी काहीही न वाटता आजच्या ‘बिग बॉस’ कार्यक्रमात कोण कुणाला काय म्हणाले ? कुणाला काय वाटले ? आता अमुक अशी वागणार, तमुक तसे उत्तर देणार ? बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर अमुक व्यक्ती तमुक काम करणार, याच्याच चर्चा बहुतांश घराघरांत चालू असल्याचे दिसते. देशाच्या सीमांवरील आणि देशांतर्गत स्थिती यांचेही भान न राहिल्याने ‘रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत होता’, अशी आजची स्थिती आहे. त्यामुळेच ‘रिॲलिटी’ कार्यक्रमांच्या मागे धावण्यापेक्षा देश, धर्म आणि समाज यांची वास्तविक स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच ‘रिॲलिटी चेक’ करून स्वतःला त्यासाठी सिद्ध करण्याचा संकल्प दसर्यानिमित्त करूया !