प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल विधान केल्याचे प्रकरण
पणजी, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ (‘डीएन्.ए.’ (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’) म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु महारक्षा आघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती. डिचोली पोलिसांनी प्रा. वेलिंगकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केल्यानंतर प्रा. वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होतो. अतिरिक्त सत्र न्यायालयाने ७ ऑक्टोबर या दिवशी रात्री प्रा. वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर प्रा. वेलिंगकर यांनी ९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती खंडपिठासमोर करण्यात आली. उच्च न्यायालयाने १० ऑक्टोबर या दिवशी यावर सुनावणी ठेवली आहे.
या प्रकरणी पोलिसांना नोटीस बजावण्यात आलेली नसल्याने ते उत्तर देण्यासाठी वेळ घेण्याची शक्यता आहे, तसेच सत्र न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केलेल्यांना प्रतिवादी करण्यात आलेले नाही. यामुळे १० ऑक्टोबर या दिवशी तेही हस्तक्षेप अर्ज प्रविष्ट करण्याची शक्यता आहे.
डिचोली पोलिसांनी प्रा. वेलिंगकर यांना बजावली तिसरी नोटीस
डिचोली पोलिसांनी ४ ऑक्टोबर या दिवशी प्रा. वेलिंगकर यांच्या विरोधात धार्मिक सलोखा बिघडवल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट केला होता. यानंतर डिचोली पोलिसांनी प्रा. वेलिंगकर यांना अन्वेषणासाठी २ वेळा नोटीस बजावली होती, तसेच सत्र न्यायालयाने प्रा. वेलिंगकर यांना नोटिसीनुसार पोलीस अन्वेषणाला सामोरे जाण्याचे आणि तपासकार्याला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते; मात्र तरीही प्रा. वेलिंगकर उपस्थित राहिलेले नसल्याने पोलिसांनी प्रा. वेलिंगकर यांना आता तिसरी नोटीस बजावली आहे. या नोटिसीत १० ऑक्टोबर या दिवशी सकाळी अन्वेषणास उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.
पोलिसांकडून प्रा. वेलिंगकर यांचा गोवा आणि महाराष्ट्र येथे शोध चालूच
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्शत कौशल म्हणाले, ‘‘प्रा. वेलिंगकर यांचा महाराष्ट्र आणि गोवा येथे विविध ठिकाणी शोध घेतला जात आहे. यासाठी अनेक व्यक्तींची चौकशी केली जात आहे.’’