लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – प्रयागराज येथील ‘महाकुंभ-२०२५’च्या पूर्वी योगी आदित्यनाथ सरकार राज्यातील सर्व १८ विभागांमध्ये ‘कुंभ शिखर परिषद’ आयोजित करत आहे. ८ ऑक्टोबर २०२४ या दिवशी लक्ष्मणपुरी येथून प्रारंभ झाला, तर १४ डिसेंबर २०२४ या दिवशी प्रयागराज येथे समारोप होईल. या परिषदांमध्ये उत्तरप्रदेशातील कलाकारांसह शाळकरी मुलांनाही सहभागी करून घेणार आहे. सरकारचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सौजन्य:Patrika.com
१. ‘कुंभ शिखर परिषदे’मध्ये कुंभ अभिनंदन पथनाट्य, बाल-युवा कुंभ, कला-संस्कृती कुंभ, कवि कुंभ आणि भक्ती कुंभ यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मणपुरीमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
२. या कुंभ संमेलनात चित्रकला आणि छायाचित्रण स्पर्धा, शास्त्रीय आणि अर्धशास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य स्पर्धा, सांस्कृतिक अन् आध्यात्मिक वारशावर आधारित प्रदर्शने, नाट्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लोककला आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये कुंभशी संबंधित विशेष प्रदर्शने, सहली आणि देखावे आयोजित केले जातील.