उडुपी पेजावर मठाधीश विश्व प्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची सरकारकडे मागणी
मंगळुरू (कर्नाटक) – हिंदूंच्या मंदिरांचे स्वतःचे नियम असतात. त्यामुळे ही मंदिरे हिंदूंना सांभाळावी लागतात. हिंदूंची मंदिरे हिंदूंना सुपुर्द केली पाहिजेत, अशी मागणी उडुपी पेजावर मठाधीश विश्व प्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी सरकारकडे केली आहे.
मंगळुरू शहरात एका पत्रकाराशी बोलतांना स्वामीजी म्हणाले की, इतर धर्मांमध्ये त्यांच्या समुदायाला त्यांच्या धार्मिक संस्था चालवण्याचे दायित्व दिले जाते. आपल्या देशात केवळ हिंदूंची मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. हिंदूंची स्वतःची अशी आचारसंहिता आहे. हे ज्यांना ठाऊक आहे त्याद्वारे धार्मिक श्रद्धाकेंद्राचे नेतृत्व केले, तर गैरवर्तन होणार नाही. अयोध्येतील श्रीराममंदिराचे व्यवस्थापन विश्वस्त मंडळाकडे आहे. तसेच हिंदूंना त्यांची मंदिरे चालवण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. पुरातन मंदिरे सरकारने स्वतःकडे ठेवली आहेत. विश्वस्त मंडळांतर्गत अयोध्येचे श्रीराममंदिराचे व्यवस्थापन कार्य होत आहे. हाच नमुना सर्व मंदिरांमध्ये पाळला जावा, असे त्यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकासंत, हिंदूंच्या संघटना आदींनी मागणी करूनही सरकार मंदिरे हिंदूंच्या हातात देण्यास सिद्ध नाही. त्यामुळे आता सर्व हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर दबाव निर्माण केला, तरच सरकार मंदिरांचे सरकारीकरण रहित करेल ! |