Supreme Court Canteen : बार असोसिएशनने कँटीनमध्ये नवरात्रोत्सवात केवळ शाकाहारी पदार्थ बनवण्याचा निर्णय केला रहित !

  • सर्वोच्च न्यायालयाच्या कँटीनमध्ये ‘शाकाहारी विरुद्ध मांसाहारी’ वाद

  • अधिवक्त्यांच्या एका गटाकडून विरोध

नवी देहली – अधिवक्त्यांच्या एका धर्मप्रेमी गटाने ‘सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’ (एस्.सी.बी.ए.) आणि ‘सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन’ (एस्.सी.ओ.आर्.ए.) यांना नवरात्रीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या कँटीनमध्ये शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय पालटून पुन्हा मांसाहारी जेवण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात पत्र लिहिले आहे. बार सदस्यांच्या भावना लक्षात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या मागणीला सर्वोच्च न्यायालयातील १३३ अधिवक्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्यांच्या अन्य एका गटाने न्यायालयाच्या कँटीनने ९ दिवस चालणार्‍या नवरात्रोत्सवाच्या काळात ‘मेनू’ केवळ नवरात्रीच्या जेवणापुरता मर्यादित ठेवण्याच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी याला विरोध करत ‘यातून चुकीची परंपरा चालू होईल’, असे म्हटले होते. या विरोधानंतर ४ ऑक्टोबरला हा निर्णय मागे घेण्यात आला.


अधिवक्ता रजत नायर यांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटले आहे ?

अधिवक्ता नायर यांनी म्हटले आहे की, हा निर्णय बारच्या परंपरांशी सुसंगत नाही. हा निर्णय असहिष्णुता आणि एकमेकांचा आदर नसल्याचे दर्शवते. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज नवरात्रीच्या काळात केवळ गुरुवार आणि शुक्रवार याच दिवसांत करायचे होते. त्यामुळे मुख्य कँटीनला या २ दिवसांसाठी नवरात्रीचे जेवण देण्याची विनंती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात कार्यरत असलेल्या ६-७ कँटीन्सपैकी कोणत्याही एका कँटीनला बारच्या सदस्यांना २ दिवस नवरात्रीचे जेवण देण्याची अनुमती दिली असती, तर कोणतीही भरून न येणारी हानी झाली नसती. तथापि बारच्या उर्वरित सदस्यांशी सल्लामसलत न करता किंवा त्यांच्या भावनांचा विचार न करता एकतर्फी कारवाई केल्याने मी तुमच्याकडे या संदर्भात अधिकृतपणे माझा निषेध नोंदवतो. भविष्यात अशी अनुचित घटना घडू नये; म्हणून पत्र लिहिण्यास आम्हाला भाग पडले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदुद्वेषी बार असोसिएशन ! हिंदूंच्या जागी अन्य धर्मियांचा सण असता आणि त्यांच्या अधिवक्त्यांनी या संदर्भात मागणी केली असती, तर बार असोसिएशनने असा मोडता घातला असता का ?