जत तालुक्यात भगरीच्या पिठातून ३०३ लोकांना विषबाधा !

जत (जिल्हा सांगली) – तालुक्यातील २५ ते ३० गावांतील नवरात्रोत्सवानिमित्त उपवास करणार्‍या एकूण ३०३ महिला आणि पुरुष यांना भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यातील अधिक त्रास असणार्‍या ९१ रुग्णांवर खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. काहींना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी जत शहरातील ‘जगदंबे ट्रेडिंग’ आस्थापन हे दुकान सील केले आहे. (दुकानांवर कारवाई करण्याच्या समवेत या प्रकरणी वेळच्या वेळी अन्नाचे नमुने न पडताळणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

या घटनेनंतर अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी ३ लाख ३४ सहस्र ९१८ रुपये किमतीचे भगरीचे विविध आस्थापनांचे नमुने जप्त केले असून ते पुढील पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुकान मालकावर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.