देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या आज्ञेने देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण नवमी (१६.३.२०२३) या दिवशी ‘दशदिक्पाल पूजन’ सनातनच्या पुरोहितांच्या हस्ते पार पडले, तसेच फाल्गुन कृष्ण दशमी (१७.३.२०२३) या दिवशी ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी साधिकेला आलेल्या त्रासदायक अनुभूती, जाणवलेली सूत्रे आणि चांगल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१. त्रासदायक अनुभूती

१ अ. ‘माझ्या डोक्यावरील केसांमध्ये पुष्कळ खाज येत होती. त्यामुळे मी अस्वस्थ होते.

१ आ.‘मनात यागाच्या आरंभी अग्नीविषयी उमटलेली भीती महर्षींनी घालवली’, असे जाणवणे : १७.३.२०२३ च्या सायंकाळी ५.१५ वाजता यागाच्या ठिकाणी आल्यावर मला त्रास देणारी वाईट शक्ती ‘काल आम्ही पावसाच्या माध्यमातून त्रास दिला. आज अग्नीच्या माध्यमातून त्रास देणार आहोत’, असे विचार माझ्या मनात सतत घालत होती. मी हे आश्रमातील संबंधित साधकाला सांगितले. तेव्हा त्यांनी अग्नीशमनाच्या संदर्भात सिद्धता केली. कार्यक्रम चालू झाल्यावर सूत्रसंचालन करणारे साधक म्हणाले, ‘‘यागातील अग्नी आपली मर्यादा कधी सोडत नाही.’’ तेव्हा ‘माझ्या मनात यागाच्या आरंभी उमटलेली ही भीती महर्षींनी घालवली’, असे मला जाणवले.

१ इ. यागानंतर २ दिवस साधिकेला ताप येणे आणि त्यामागील वाईट शक्तीचे कार्य लक्षात येणे : १७.३.२०२३ या दिवशी मला कोणतेही भौतिक कारण नसतांना ताप आला. माझ्या सर्व शरिरात पू झाल्याप्रमाणे अंग ठणकत होते. दुसर्‍या दिवशी त्रासाचे प्रमाण थोडे उणावले. तिसर्‍या दिवशी ताप उणावला; पण थकवा होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘याग होऊनही मला होणारा आध्यात्मिक त्रास उणावला नाही. तेव्हा मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीने माझ्या मनात विचार घातला, ‘तुम्ही एक याग केला; पण आम्ही तुम्हाला शह देण्यासाठी १० याग केले.

२. यागाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

२ अ. ‘वाईट शक्तींनी अल्प कालावधीत सूक्ष्मातून १० याग केले’, असे मला जाणवणे : ‘वाईट शक्तींनी देवद आश्रमातील ‘यागाचा संकल्प पूर्ण होऊ नये’, यासाठी आणि त्यापासून निर्माण झालेल्या चैतन्याला शह देण्यासाठी आश्रमाच्या पूर्वेकडील मोकळ्या जागेत अन् आश्रमाच्या पश्चिमेकडे अल्प कालावधीत सूक्ष्मातून १० याग केले’, असे मला जाणवले.

२ आ. ‘यागांमुळे होणार्‍या सूक्ष्म युद्धात माझे शरीर ही एक युद्धभूमी असल्याने मला त्याचा परिणाम जाणवत होता’, असे माझ्या लक्षात आले.

२ इ. ‘त्रेतायुगात भगवान श्रीरामाच्या काळात ऋषिमुनी करत असलेल्या यागांमध्ये राक्षस कसे अडथळे निर्माण करत असतील ?’, हे लक्षात येणे : वाईट शक्ती सूक्ष्म असून त्यांची शक्ती अफाट असल्याने त्यांना मानवाप्रमाणे सिद्धता करण्यासाठी स्थुलातून कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्याला शह देणे अधिक सोपे असते. यावरून ‘त्रेतायुगात भगवान श्रीरामाच्या काळात ऋषिमुनी करत असलेल्या यागामध्ये राक्षस कसे अडथळे निर्माण करत असतील’, हे माझ्या लक्षात आले.

३. चांगल्या अनुभूती

३ अ. ‘यागातील चैतन्याने माझ्या मस्तिष्क पोकळीतील नकारात्मक शक्तीचे विघटन होत आहे’, असे जाणवणे आणि भावजागृती होऊन चांगले वाटणे : माझ्या डोक्यावर सहस्राराभोवती मला पुष्कळ संवेदना होत होत्या. ‘जणू यागातील चैतन्याने माझ्या मस्तिष्क पोकळीतील नकारात्मक शक्तीचे विघटन होत आहे’, असे मला जाणवत होते; परंतु एकीकडे सतत भावजागृती होऊन मला चांगले वाटत होते.

३ आ. आश्रमातील वातावरणात आनंद जाणवणे : ‘१६.३.२०२३ आणि १७.३.२०२३ हे दोन दिवस देवद आश्रमात एक विधी आहे’, असे मला कळले. तेव्हा आश्रमाच्या परिसरामध्ये ५ – ६ दिवस आधीपासून गायीच्या शेणाने सारवणे आणि मोठा मंडप बांधणे इत्यादी सेवा चालू झाल्या होत्या. तेव्हा वातावरणात पुष्कळ आनंद जाणवत होता.

३ इ. वातावरण आनंदी झाल्यामुळे व्यष्टी साधनेचे विचार येणे आणि खंडित झालेले व्यष्टी लिखाण चालू होणे : मला आध्यात्मिक त्रास आहे. यागाच्या आधी मागील दीड मासापासून मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासांत वाढ झाली होती. व्यष्टी साधनेविषयी कमालीची उदासीनता आली होती; मात्र आश्रमात निर्माण झालेल्या आनंदी वातावरणाने माझ्या मनात व्यष्टी साधनेचे विचार येऊन लिखाण नियमित चालू झाले.

३ ई. ‘याग ब्रह्मांडाच्या पोकळीत चालू असून देवद आश्रम ब्रह्मांडाच्या पोकळीत आहे’, असे दिसणे आणि तेथून पिवळा प्रकाश सर्वत्र पसरत आहे’, असे जाणवणे : प्रत्यक्ष यागाच्या स्थळी जाऊन बसल्यावर मला ‘तेथील सर्व गोष्टी पुष्कळ लहान लहान दिसू लागल्या आणि तो सर्व परिसर ब्रह्मांडाच्या पोकळीत आहे’, असे मला दिसू लागले. ‘याग ब्रह्मांडाच्या पोकळीत चालू असून देवद आश्रम ब्रह्मांडाच्या पोकळीत आहे’, असे दिसत होते. ‘तेथून पिवळा प्रकाश सर्वत्र पसरत आहे’, असे मला जाणवत होते.

३ उ. सूक्ष्मातून अनेक माध्यमांतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व अनुभवणे आणि कृतज्ञताभाव जागृत होऊन डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वहाणे : यागाच्या दिवशी सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आठवण येत होती. माझी आंतरिक दृष्टी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा ‘यागाच्या जवळील प्रचंड चैतन्य, सर्वत्र पसरलेला पिवळा प्रकाश, विविध संतांची स्थुलातून आणि सूक्ष्मातून असलेली उपस्थिती या सर्वांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले व्यापून गेले आहेत. ते पूर्णतः निर्गुण स्थितीतून त्यांची उपस्थिती मला दाखवून देत आहेत’, असे मला जाणवत होते.

तेव्हा ‘माझी परात्पर गुरुमाऊली किती महान आहे !’, हे त्यांनीच पुन्हा एकदा माझ्या लक्षात आणून दिले आणि ‘प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व निर्गुण चैतन्याच्या स्तरावर कसे आणि कुठे अनुभवायचे ?’, हे त्यांनीच मला शिकवले. त्या वेळी माझा कृतज्ञताभाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वहात होत्या.

मी मागील १७ वर्षांपासून देवद आश्रमात रहात आहे. आता ‘येथील भूमीचे भाग्य उजळू लागले आहे’, असे मला वाटते. महर्षि, ऋषिमुनी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व संत यांच्या कृपेमुळेच हे शक्य होत आहे. त्यांच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक प्रणाम !’

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.३.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक