देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’च्या वेळी साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे, जाणवलेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील वाईट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत, तसेच सद्गुरु, संत आणि साधक यांच्या सर्व प्रकारच्या त्रासांचे निवारण व्हावे’, यांसाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण दशमी (१७.३.२०२३) या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे, जाणवलेले त्रास आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. कोमल जोशी

१. जाणवलेली सूत्रे

अ. ‘यागाच्या ठिकाणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्या वेळी ‘त्यांच्यामधील देवीतत्त्व प्रकट होऊन ते कार्यरत झाले आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘देवद आश्रमातील कार्यात येणारे तांत्रिक अडथळे दूर होण्यासाठी, म्हणजे आधुनिक उपकरणांचा वापर आणि बांधकाम या गोष्टींसाठी यागाचा लाभ होणार आहे’, असे मला वाटले.

इ. या यागाचा परिणाम साधकांच्या मनावर होऊन साधकांच्या प्रयत्नांतील अडथळे दूर होऊन साधकांची सकारात्मकता वाढून त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल’, असे देवाने मला सांगितले.

ई. ‘देवद आश्रमातील चैतन्य वाढून तेथील साधकांच्या साधनेतील बौद्धिक आणि मानसिक अडथळे दूर होतील’, असे मला वाटले.

उ. ‘साधक आध्यात्मिक स्तरावर राहून त्यांचे मन शुद्ध होण्यासाठी शिवाचा आशीर्वाद साधकांना मिळत आहे’, असे मला जाणवले.

ऊ. ‘विष्णुप्रमाणे आता शिवाचे कृपाछत्र देवद आश्रमात सतत रहाणार असून साधकांच्या मनाची शुद्धीकरण प्रक्रिया चालू झाली आहे’, असे मला जाणवले.

२. त्रासदायक अनुभूती

अ. मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला पुष्कळ त्रास होत होता. त्यामुळे माझी अंगदुखी वाढली होती. माझा देह आणि डोळे यांतून गरम वाफांच्या माध्यमातून त्रासदायक शक्ती बाहेर पडत होती.

आ. यागाच्या वेळी ‘माझे शरीर म्हणजे युद्धभूमी आहे’, असे मी अनुभवत होते.

इ. चैतन्याचा स्रोत माझ्या शरिरातील पेशीपेशीत आणि माझ्या शरिरात वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या स्थानांवर पोचत होता. तेथील त्रासदायक शक्ती खेचून बाहेर काढली जात होती.

ई. याग चालू असतांना मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीची अस्वस्थता वाढली होती. त्यामुळे ‘तिथून उठून जावे’, असे मला वाटत होते. मला प्रयत्नपूर्वक शेवटपर्यंत बसावे लागले.

उ. मला थंडी वाजत होती. माझ्या देहाभोवती गारवा होता; पण माझे अंग मात्र ताप आल्याप्रमाणे गरम झाले होते. डोळे रखरखले होते. हाडे आणि स्नायू यांवर यागाचा परिणाम होऊन माझ्या शरिरातील वेदना वाढल्या होत्या.

ऊ. सूक्ष्मयुद्ध सतत होत असल्याने मला थकवा जाणवत होता. माझ्या डोक्यावर दाब जाणवत होता. माझे अंग ठणकत होते; पण मनाची सकारात्मकता वाढली होती. मन आनंद अनुभवत होते.

३. चांगल्या अनुभूती

अ. याग चालू असतांना मला ध्यानस्थ शिवाचे अस्तित्व जाणवून वातावरणात शीतलता जाणवत होती. त्यामुळे मला यागासमोर अग्नीच्या जवळ बसूनही थंडी वाजत होती.

आ. यज्ञातून निघणार्‍या अग्नीच्या ज्वाळांमध्ये मला ‘ॐ’ दिसत होता. (प्रत्यक्षही याग पूर्ण झाल्यावर आम्हाला यागात उमटलेल्या ‘ॐ’ चे छायाचित्र दाखवण्यात आले.)

इ. ‘यागातील ज्वाळांमधून निघालेल्या निर्गुण चैतन्याचे देवद आश्रमाभोवती संरक्षणकवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवत होते.

ई. त्या वेळी वातावरणात ‘त्रिशूळ आणि देवीची शस्त्रे वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत आहेत’, असे मला जाणवले.

उ. ‘याग स्थळी उपस्थित असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शरणागतीने झालेल्या प्रार्थनेमुळे साधकांना लाभ होत आहे’, असे मला जाणवत होते.

ऊ. ‘यागातील निर्गुण चैतन्याचा स्तर वाढला असून वाईट शक्तींनी निर्माण केलेली आश्रमातील नकारात्मक विचारांची स्पंदने नष्ट होत आहेत’, असे मला जाणवले.

ए. ‘अग्नीतील ज्वाळा वर वर उंच जाऊन त्यातून अनेक ॐ पूर्ण ब्रह्मांड पोकळीमध्ये जात आहेत’, असे मला जाणवत होते.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला हे सर्व अनुभवता आले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.३.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक