दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १८ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू !; मुंबईत इमारतीचे छत कोसळले !

१८ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू !

नंदुरबार – अंबापूर-राणीपूर रस्त्यावर रोहित मोरे (वय १० वर्षे) बकर्‍यांना चरायला घेऊन गेला होता. त्या वेळी अचानक बिबट्याने आक्रमण करून रोहितला उसाच्या शेतात फरफटत नेले. यात रोहितचा मृत्यू झाला. १५ दिवसांपूर्वी राणीपूर ग्रामस्थांनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाकडे पिंजरा लावण्याविषयी विनंती केली होती. ‘वन विभागाने पिंजरे लावले असते, तर रोहितचा मृत्यू झाला नसता’, अशी संतप्त भावना राणीपूर ग्रामस्थांनी व्यक्त केली.


मुंबईत इमारतीचे छत कोसळले !

मुंबई – ग्रँट रोड येथील मौलाना शौकत अली रस्त्यावरील शालिमार उपाहारगृहाजवळ ३ ऑक्टोबरला सकाळी ‘युनायटेड चेंबर्स’ या इमारतीच्या दुसर्‍या आणि चौथ्या मजल्यावरील छत कोसळले. या दुर्घटनेत कुणीही मृत झालेले नाही; मात्र ढिगार्‍याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


डोंबिवलीत साहाय्यक अभियंत्याला मारहाण; दोघांना अटक !

डोंबिवली – जुनी डोंबिवली शाखा कार्यालयाचे साहाय्यक अभियंता जयेश बेंढारी कर्मचार्‍यांसह दुरुस्तीचे काम करत खंडित वीजपुरवठा चालू करत होते. मुकेश पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बेंढारी यांना शिवीगाळ केली. बेंढारी यांनी असभ्य भाषेविषयी आक्षेप घेतल्यानंतर मुकेश पाटील यांच्यासमवेत असलेल्या एकाने त्यांना कानशिलात लगावली, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. बेंढारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून पोलिसांनी मुकेशसह अन्य एकाला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका : अशांना कठोर कारवाई करायला हवी !


भिवंडीत तेलगळतीमुळे भीषण स्फोट !

ठाणे – भिवंडी येथील ‘तपस्या डाईंग’ या कापड आस्थापनात बॉयरलमध्ये तेलगळती होऊन स्फोट झाला. ही घटना २ ऑक्टोबरच्या रात्री घडली; मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत आस्थापनाची कोट्यवधी रुपयांची हानी झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोचल्या. कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. २ घंट्यांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.