‘२६.२.२०२४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर, आश्रम पहातांना आणि संतांच्या मार्गदर्शनाच्या वेळी सनातनच्या ८५ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६५ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती
अ. आश्रमात आल्यावर ‘मी वैकुंठलोकात आले आहे’, असे वाटले.
आ. मी पाय धुतांना गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) बालरूप डोळ्यांसमोर दिसले. तेव्हा ‘मला माझे पूर्ण शरीर पिवळे झाले आहे’, असे जाणवले.
इ. मी विश्रांतीसाठी खोलीत गेल्यावर मला पुष्कळ सुगंध येत होता. ‘मखमली आसनावर साक्षात् गुरुदेव आणि प.पू. भक्तराज महाराज बसले आहेत’, असे वाटले.
२. आश्रम पहातांना आलेल्या अनुभूती
अ. ध्यानमंदिरात गेल्यावर ‘तेथे प्रत्यक्ष गुरुदेवच आहेत’, असे मला जाणवले. मी सूक्ष्मातून गुरुदेवांच्या चरणांचे दर्शन घेतल्यावर मला गुरुदेव भेटल्याचा आनंद झाला.
आ. आश्रम दाखवणार्या साधकांमध्ये मला गुरुदेवांचे बालरूप, कधी श्रीविष्णु, तर कधी श्रीकृष्ण यांचे रूप दिसत होते.
इ. मला तुळस आणि तुळशीची मंजिरी यांचा पुष्कळ सुगंध येत होता. साधकांना विचारल्यावर त्यांनी ‘आजूबाजूला तुळस नाही’, असे सांगितले.
ई. आश्रमातील प्रत्येक विभागात गेल्यावर साधकांचे भरभरून प्रेम अनुभवता आले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मी लहानपणापासून अनाथ असून मला कधी कोणाचे प्रेम मिळाले नाही; पण गुरुदेवांनी मला साधकांच्या रूपात प्रेम दिले.’
उ. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या भेटीच्या वेळी ते मला एका तेजस्वी बालरूपात दिसत होते. त्यांचे ते रूप सुंदर आणि गुलाबी दिसले.
ऊ. आश्रमातील गणपतीचे दर्शन घेतांना श्री गणेशाच्या जागी मला गुरुदेवांचे बालरूपात दर्शन झाले. त्यांनी मला गंध लावले. मारुतिरायांचे दर्शन घेतांना ‘मारुति हसला आणि त्याच्या डोळ्यांतून असंख्य दैवीकण बाहेर पडत आहेत’, असे मला जाणवले.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भेटीच्या वेळी आलेल्या अनुभूती
३ अ. गुरुदेवांनी वाकून नमस्कार करतांना गुरुदेव बालरूपात दिसणे : गुरुदेवांच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी गुरुदेवांनी मला वाकून नमस्कार केला. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. गुरुदेवांनी मला विचारले, ‘‘मी तुम्हाला दिसत आहे ना ? आता मी तुम्हाला नमस्कार का केला ? याचे उत्तर तुम्हीच द्या.’’ तेव्हा मी गुरुदेवांना सांगितले, ‘‘मला एक पाळणा दिसला आणि पाळण्यामध्ये बाळ दिसले. ते बाळ म्हणजे गुरुदेव तुम्हीच होता; म्हणून तुम्ही नमस्कार केला.’’ असे सांगितल्यावर गुरुदेव हसले. (या प्रसंगी उपस्थित साधकांना श्रीराम आणि भक्त शबरी यांच्या भेटीचे स्मरण झाले.)
३ आ. ‘गुरुदेवच सर्व सेवा करवून घेत आहेत’, याची सतत अनुभूती येणे : त्यानंतर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्ही सेवा कशी करता ? सात्त्विक उत्पादनांचे वितरण कसे करता ? भावजागृतीचे प्रयत्न कसे करता ?’, याविषयी उपस्थितांना सांगा.’’ मी म्हणाले, ‘‘सेवा करतांना साधक माझ्या समवेत येतो. जिज्ञासूंनी अर्पण दिल्यावर त्यांना द्यायच्या पावत्या मी साधकाकडून भरून घेते. सेवा करतांना संपर्काची नावे गुरुदेव सुचवतात. मी गुरुदेवांना ‘मला तर काही बोलता येत नाही. जिज्ञासूंवरील अनिष्ट शक्तीचे आवरण निघून जाऊ दे आणि तुमचा हात त्यांच्या मस्तकावर असू दे’, अशी शरण जाऊन प्रार्थना करते. त्यानंतर जिज्ञासूंना भ्रमणभाष केल्यावर ते काही न बोलता सहजपणे अर्पण देतात.
भावजागृतीचे प्रयत्न करतांना मी सूर्याचे दर्शन घेतल्यावर माझ्याकडून लगेच प्रार्थना होते. सूर्य, चंद्र, तारे यांमध्ये गुरुदेवच दिसतात. गुरुदेवांना अगदी कळकळीने प्रार्थना करून भावजागृती होते. प्रतिदिन वेगवेगळी भावगीते आठवतात. भावगीतांमधून मला गुरुदेवांची निरपेक्ष प्रीती अनुभवता येते.’’
३ इ. गुरुदेवांसमोर भावगीत म्हणतांना गुरुदेवांना प्रार्थना करणे : त्यानंतर गुरुदेवांनी मला एक भावगीत म्हणायला सांगितले. प्रत्यक्ष ईश्वरासमोर भावगीत म्हणतांना पुष्कळ कृतज्ञता जाणवत होती. त्या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘‘नाम आणि सेवा यांची इतकी मोठी श्रीमंती तुम्ही मला दिलेली आहे. ही या जगात सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. त्यांचा मला कधीही विसर पडू देऊ नका. त्यांची मला सतत जाणीव राहू द्या.’’
४. आश्रमात अन्य वेळी आलेल्या अनुभूती
अ. आश्रमात महाप्रसादाच्या वेळी साधकांनी माझ्यासाठी ताट वाढून आणले. केवळ गुरुदेवांमुळेच मला साधकांमधील निरपेक्ष प्रेम अनुभवता आले. जेवतांना गोड पदार्थ ताटात नसतांनाही मला गोड चव लागली.
आ. ‘आश्रमातील पायर्या म्हणजे जणू वैकुंठातील सोन्याच्या पायर्या आहेत’, असे मला जाणवत होते. त्या पायर्या गुळगुळीत झाल्या आहेत. मला सगळीकडे मोगरा आणि चंदन यांचा सुगंध येत होता.
इ. एकदा मला अंघोळ करण्यासाठी स्नानगृहात जायचे होते; परंतु इतर साधक झोपल्यामुळे मी दिवा लावला नाही. तेव्हा ‘कोणीतरी मला स्नानगृहापर्यंत सहज नेऊन पोचवले’, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मला चंदनाचा सुगंध येत होता. ‘ते अन्य कुणी नसून गुरुदेवच होते’, हे मी अनुभवले.
ई. पहाटे अंधार होता. मला काही दिसत नव्हते; पण तेव्हा मला फडकणारा झेंडा दिसत होता.
उ. परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी मी ध्यानमंदिरात दर्शनाला गेले. तेथे मला पुष्कळ रडू येत होते. ‘मला माझे माहेर सोडून परत घरी परतावे लागत आहे’, असे वाटत होते आणि गुरुदेवांची पुष्कळ आठवण येत होती. त्या क्षणी ‘एक १० वर्षांचा मुलगा माझा हात धरून तो मला ओढून घेऊन जात आहे’, असे मला दिसले.
कितीही लिहिले, तरी कित्येक जन्म पुरणार नाहीत, इतकी माझ्यावर गुरुदेवांची कृपा आहे. मला शेवटी एकच वाक्य आठवते, ‘मीपण माझे विसरून गेले, गुरुचरणी माझा जीव कृतार्थ झाला.’
– (पू.) सौ. संगीता महादेव पाटील, भोसरी, पुणे. (१४.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |