‘सनातन संस्थेच्या’ फोंडा, गोवा येथील साधिका श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे) यांचा थोरला मुलगा श्री. सुजित रुग्णाईत असतांना, तसेच त्यांच्या हृदयाचे शस्त्रकर्म करतांना त्यांनी पदोपदी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा अनुभवली. त्याविषयी त्यांचे हृदगत येथे पाहू. २८ सप्टेंबर या दिवशी यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/838410.html
७. श्री. सुजित यांच्यावर मुंबईतील आधुनिक वैद्यांच्या देखरेखीखाली शस्त्रकर्म करण्याचे ठरणे
‘लगेचच शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सर्वांनी सांगितले; मात्र त्यावर सुजितचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता. तो शस्त्रकर्म करायला सिद्ध होईना. तेव्हा आतापर्यंतच्या सर्व अनुभूती सुजितला सांगितल्यावर त्या आठवून तो शस्त्रकर्म करायला सिद्ध झाला. ‘गोव्यातच मणिपाल रुग्णालयात शस्त्रकर्म करावे’, असे आम्ही ठरवत होतो. तेव्हा देवाच्या असीम कृपेने माझा मधला मुलगा विक्रांत (वय ५१ वर्षे) गोव्यात होता. तो ‘अँजिओग्राफी’साठी सुजितसमवेत मडगाव (गोवा) येथील ‘व्हिक्टर’ रुग्णालयात गेला होता. तोच त्याची सर्व काळजी घेत होता. विक्रांतचे मित्र आधुनिक वैद्य सूर्यकांत चौधरी हे ‘बॉम्बे रुग्णालया’मध्ये ‘कर्करोग तज्ञ’ म्हणून कार्यरत आहेत. तेही रुग्णालयात आले होते. ‘अँजिओग्राफी’चा अहवाल पाहून ते म्हणाले, ‘‘आपण सुजितचे शस्त्रकर्म माझ्या परिचयाचे मुंबईचे प्रसिद्ध शस्त्रकर्मतज्ञ अनिरुद्ध त्रिवेदी यांच्याकडे करू.’’
८. शनीची साडेसाती असल्यामुळे पुरोहितांकडून ‘श्री ललिता सहस्रनामाचे’ २१ पाठ करवून घेणे
१०.१.२०२३ या दिवशी विक्रांत सुजितला मुंबईला घेऊन गेला. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ काका यांनी त्याला उपायांचा नामजप दिला. माझी बहीण ज्योतिषी (श्रीमती) यशश्री हेंद्रे हिने त्याला ‘शनीची पनोती’ असल्याने हृदयासाठी ‘श्री ललिता सहस्रनामा’चे २१ पाठ करायला सांगितले. १७.१.२०२३ या दिवशी शूलयोग असल्याने हे पाठ पुरोहित श्रेयस पिसोळकर यांनी १६ आणि १७ जानेवारी या दिवशी केले.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडणे
सद्गुरु गाडगीळकाका यांनी सांगितलेला नामजप मी आणि माझी नात कु. कल्याणी सुजित मुळे (वय १४ वर्षे) करत होतो. मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच आधुनिक वैद्य त्रिवेदींच्या माध्यमातून शस्त्रकर्म करत आहेत’, असा भाव ठेवत होते. मी सतत ‘औषधांभोवती नामाचे सूक्ष्म, अखंड आणि अभेद्य संरक्षक कवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना करत होते. त्याचे शस्त्रकर्म जवळजवळ ६ घंटे चालू होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने शस्त्रकर्म व्यवस्थित झाले. त्यानंतर त्याला १० दिवस अतिदक्षता विभागात (‘आय.सी.यु.’त) ठेवून बरे वाटल्यावर बाहेर आणले. १२ व्या दिवशी त्याला घरी सोडले. अशा तर्हेने गुरुदेवांनी काळजी घेतली.
१०. मधल्या मुलाने कठीण प्रसंगी देवाप्रमाणे उभे राहून सर्व दृष्टीने साहाय्य करणे
विक्रांतने त्याची पुष्कळ काळजी घेतली. त्याने त्याचे सर्व दायित्व घेतले. त्याचा स्वभाव मनमिळाऊ आणि घरातील सर्वांचीच काळजी घेणारा आहे. माझ्या आजारपणात, तसेच माझी नात कु. करुणा (वर्ष २०१८ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित, वय १९ वर्षे) हिला मे मासात क्षयरोग (टी.बी.) झाला होता, त्या वेळीही त्याने तिचीही पुष्कळ काळजी घेतली. तो ठाण्याला गेल्यावरही तेथून प्रत्येक ४ – ५ दिवसांनी चौकशी करत असे. त्याच्यामुळेच घरात वातावरण चांगले असते. स्वतःचे कार्यालय (ऑफीस) सांभाळून घरातील सर्व व्यवहारही तो पहातो. देवाने मला असा गुणी मुलगा दिला आहे, यासाठी देवाच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी अल्पच आहे.’
(समाप्त)
– चरणदासी, श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे), फोंडा, गोवा. (१३.२.२०२३)
|