डॉक्‍टरांच्‍या देखरेखीखाली इच्‍छामृत्‍यूच्‍या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी !

रुग्‍णाचा ‘लाईफ सपोर्ट’ काढायचा कि नाही, हे ४ अटींवर आधारित असणार !

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने इच्‍छामृत्‍यूच्‍या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा प्रसारित केला आहे. यांतर्गत गंभीर आजारी असलेल्‍या रुग्‍णांकडून ‘लाईफ सपोर्ट’ (लाईफ सपोर्ट म्‍हणजे अत्‍यवस्‍थ रुग्‍णाचा जीव वाचवण्‍यासाठी केलेली वैद्यकीय व्‍यवस्‍था) काढून टाकायचा कि नाही, याविषयी अत्‍यंत काळजीपूर्वक निर्णय घ्‍यावा लागेल, असे सांगण्‍यात आले आहे. या तत्त्वांमध्‍ये ४ अटी ठेवण्‍यात आल्‍या असून त्‍या आधारे रुग्‍णाच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने ‘लाईफ सपोर्ट’ थांबवणे योग्‍य आहे कि नाही, याचा निर्णय घेतला जाईल.

‘लाईफ सपोर्ट’ हटवण्‍याच्‍या या आहेत त्‍या ४ अटी !

१. रुग्‍णाला ‘ब्रेनस्‍टेम डेड’ (मेंदू निकामी झाल्‍याची अवस्‍था) घोषित करण्‍यात आले असेल. (या स्‍थितीत रुग्‍ण शुद्धीत रहात नाही, तसेच त्‍याला श्‍वासोच्‍छ्वासही करता येत नाही.)

२. रुग्‍णाचा रोग प्रगत अवस्‍थेत पोचला आहे आणि उपचारांचा त्‍याला कोणताही लाभ होणार नाही, हे डॉक्‍टरांनी स्‍पष्‍ट केले असेल.

३. कुटुंबाने ‘लाईफ सपोर्ट’ चालू ठेवण्‍यास नकार दिला असेल.

४. ‘लाईफ सपोर्ट’ हटवण्‍याची प्रक्रिया ही सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून निश्‍चित केलेल्‍या दिशा-निर्देशांनुसारच केली जावी.

अशा मार्गदर्शक तत्त्वांमुळे डॉक्‍टर तणावाखाली येतील ! – इंडियन मेडिकल असोसिएशन

या मार्गदर्शक सूचनांसंदर्भात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्‍यक्ष डॉ. आर्.व्‍ही. अशोकन् यांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे. ते म्‍हणाले की, या तत्त्वांमुळे डॉक्‍टरांना कायदेशीर तपासणीच्‍या कक्षेत आणून त्‍यांच्‍यावर ताण येईल. असे क्‍लिनिकल (वैद्यकीय) निर्णय डॉक्‍टर सद़्‍भावनेने घेत असतात. अशा प्रत्‍येक प्रकरणात रुग्‍णाच्‍या कुटुंबियांना सूंपर्ण परिस्‍थिती समजावून सांगितली जाते. अशी तत्त्वे बनवणे आणि ‘डॉक्‍टर चुकीचे निर्णय घेतात’ किंवा ‘निर्णय घेण्‍यास विलंब करतात’, असा कथितपणे दावा करणे म्‍हणजे परिस्‍थितीचे चुकीचे वर्णन आहे.