Kashi Vidvat Parishad : मंदिरात प्रसाद म्‍हणून सुका मेवा वापरला जाणार !

काशी विद़्‍वत परिषदेचा निर्णय

वाराणसी – काशी विद़्‍वत परिषदेने देशातील मंदिरांमध्‍ये नवीन प्रसाद प्रणाली लागू करण्‍यासाठी प्रयत्न चालवले आहेत. या अनुषंगाने मंदिरांमध्‍ये प्रसाद म्‍हणून सुका मेवा वापरला जाणार आहे. प्रसादातील भेसळ रोखण्‍यासाठी काशी विद़्‍वत परिषद आणि अखिल भारतीय संत समिती यांच्‍यासह काशीतील अनेक धार्मिक संघटना यांनी प्रसाद म्‍हणून बताशा आणि सुका मेवा वापरण्‍याचा निर्णय घेतला आहे.

१. काशी विद़्‍वत परिषदेचे सरचिटणीस रामनारायण द्विवेदी यांनी सांगितले की, भारतातील सर्व मंदिरांमध्‍ये काशी विद़्‍वत परिषदेने सर्व संतांशी चर्चा करून धार्मिक सर्व खाद्यपदार्थ पूर्ण शुद्ध आणि स्‍वच्‍छ ठेवण्‍याची व्‍यवस्‍था राबवण्‍याचा निर्णय घेतला आहे.

२. तिरुपती बालाजी मंदिरात अशुद्ध प्रसाद दिला जात असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रयागराजमधील प्रमुख मंदिरांमध्‍येही बाहेरून मिठाई, लाडू, पेढे आदी प्रसाद आणण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे.

३. अलोप शंकरीदेवी मंदिराचे मुख्‍य पुजारी आणि श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीचे सचिव यमुना पुरी महाराज यांनी सांगितले की, सध्‍या भाविकांना बाहेरून मंदिरात गोड प्रसाद आणण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे.

४. संगमाच्‍या काठावर असलेल्‍या बडे हनुमान मंदिराचे पुजारी आणि श्रीमठ बाघंबरी गड्डीचे महंत बलबीर गिरीजी महाराज म्‍हणाले की, मंदिर व्‍यवस्‍थापन स्‍वतः लाडूचा नैवेद्य बनवून देवाला अर्पण करेल आणि तो भक्‍तांना उपलब्‍ध करून दिला जाईल.

५. यमुनेच्‍या काठावर असलेल्‍या मनकामेश्‍वर मंदिराचे महंत श्रीधरनंद ब्रह्मचारीजी महाराज म्‍हणाले की, तिरुपती वादानंतर मनकामेश्‍वर मंदिरात बाहेरून प्रसाद आणण्‍यास बंदी घातली आहे.

६. प्रयागराजच्‍या प्रसिद्ध श्री ललितादेवी मंदिराचे मुख्‍य पुजारी शिव मुरत मिश्रा म्‍हणाले की, मंदिरात देवीला गोड प्रसाद दिला जाणार नाही; तर नारळ, फळे, सुका मेवा इत्‍यादी भाविकांना प्रसाद म्‍हणून देण्‍यात येणार आहे. भविष्‍यात मंदिर परिसरातच दुकाने उघडण्‍याची योजना असून तेथे भाविकांना शुद्ध गोड प्रसाद मिळेल.