अंगणवाडी कर्मचारी या समाजाचा आधारभूत घटक म्हणून कार्यरत आहेत. ‘कोरोना’च्या काळात या महिला कर्मचार्यांनी आरोग्य कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. ‘लाडकी बहीण’ योजना गोरगरिबांपर्यंत पोचवून त्यांना आधार दिला. या महिला कर्मचार्यांचा एक प्रश्न मात्र लालफितीत अडकला आहे. वर्ष २०१९ पासून अंगणवाडी कर्मचार्यांना त्यांच्या जवळच्या भागातच काम करता यावे, यासाठी ‘या कर्मचारी रहात असलेल्या परिसरातच अंगणवाडीत नियुक्त करावे’, असा आदेश महाराष्ट्र शासनाने दिला; मात्र त्याच वेळी या कर्मचार्यांचे स्थानांतर करण्याची मुभा काढून घेण्यात आली. त्यामुळे वर्ष २०१९ पूर्वी ज्या महिला कर्मचार्यांची ‘नंतर तुमच्या भागात स्थानांतर करून देऊ’, असे सांगून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एक चांगला आदेश काढला; मात्र दुसर्या आदेशामुळे काही जणांना अडचणही येऊ शकते, हे मात्र प्रशासनाच्या लक्षात आले नाही. असो. या प्रश्नासह अन्य प्रश्नांसाठी २५ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन चालू झाले आहे.
कोल्हापूर शहर मोठे आहे. काही अंगणवाडी कर्मचार्यांना सकाळी दीड घंटा आणि दुपारी दीड घंटा बसचा प्रवास करावा लागतो. त्यातच शहरातून उपनगरात जाणार्या बसची उपलब्धता अल्प असल्याने बसची वाट पहाण्यात १ ते दीड घंटा जातो. त्यामुळे सकाळी ९.३० वाजता बाहेर पडलेली भगिनी दुपारी ४-५ वाजता घरी पोचते. गरीब घरातील या महिलांना नवरा, मुले यांचे सगळे आटोपण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच घरी आल्यानंतर अंगणवाडीच्या भागातील लहान मुले, माता यांचे वजन, उंची यांसारखी माहिती नोंद करून वह्या भराव्या लागतात.
या महिलांचे स्थानांतर करण्याची अनुमती देणारा अध्यादेश सिद्ध असल्याचे शासकीय अधिकार्यांकडून समजते. आता अनेक ठिकाणी अंगणवाड्यांवर नवीन सेविकांच्या नियुक्त्या होणार आहेत. त्यापूर्वी हा आदेश महिला आणि बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी लागू करायला हवा. त्यामुळे महाराष्ट्रातील शेकडो अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटणार आहेत. शासनाने या कर्मचार्यांना वेतनवाढीचे आश्वासनही दिले आहे; मात्र ते पूर्ण करण्यासाठी शासनाला पैसे लागतील; मात्र स्थानांतराचा आदेश लागू करण्यासाठी कोणतेही प्रावधान करावे लागणार नाही. शासनाचा कार्यकाल पूर्ण होत आल्याने बालविकासमंत्री अदितीताईंनी यात जातीने लक्ष घालून अध्यादेश तात्काळ लागू करण्याचा आदेश द्यावा. असे केल्याने समाजोपयोगी कामात नेहमीच अग्रेसर असणार्या अंगणवाडीच्या ताईंना माेठा आधार मिळेल !
– सौ. विजया निंबाळकर, कोल्हापूर.