गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक पाहून लहान मुले काय म्हणतील ? – सौ. सुप्रिया सुळे, खासदार, शरदचंद्र पवार गट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंदूक हातात घेतलेले बॅनर प्रसिद्ध !

मुंबई – सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले आहेत. त्यावर ‘बदला पुरा’ असे लिहिण्यात आले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. याविषयी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘मला सगळ्यांत अधिक दु:ख एका गोष्टीचे झाले. देवेंद्रजी बंदूक दाखवत आहेत. हा बंदुकांचा देश नाही. हा शाहू, फुले, आंबेडकर यांचा देश आहे, राज्य आहे. त्यामुळेत देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदुका दाखवल्या, तर आम्ही येथून राज्यघटना दाखवू. गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणे आणि त्याचे पोस्टर करणे, हे माझ्यासारख्या महिलेसाठी धक्कादायक आहे. असे चित्र पाहून लहान मुले काय म्हणतील ? त्यांच्यावर काय संस्कार होतील ? मिर्झापूर टीव्ही सिरीज मध्ये या गोष्टी चालतात.’’

पोलिसांकडील बंदूक माता-भगिनी यांच्या रक्षणासाठीच ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या अक्षय शिंदे याला फाशी देण्यासाठी विरोधकांनी ८ घंटे रेल्वे रोखून धरली होती. त्या वेळी आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी विरोधक करत होते; मात्र तेच विरोधक अक्षय शिंदे याच्या मृत्यूवरून टीका करत आहेत. पोलिसांनी स्वरक्षणासाठीच अक्षय शिंदे याला गोळ्या झाडल्या. पोलिसांकडील बंदूक ही माता-भगिनी यांच्या रक्षणासाठीच आहे, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. २५ सप्टेंबर या दिवशी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले.