१. एक साधिका , सोलापूर
अ. ब्रह्मोत्सव सोहळा प्रत्यक्ष चालू असतांना ‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) रथावर साक्षात् हनुमंत आहे’, असे मला जाणवले.
आ. सोहळ्याच्या वेळी एकाच दिशेला वारा वहात होता. तो पाहून ‘वायुदेवता प.पू. गुरुदेवांच्या चरणांची सेवा करत आहे’, असे मला जाणवले.
इ. माझ्या मनातील निरर्थक विचार मोठ्या प्रमाणात न्यून झाले. मी रात्रभर न झोपताही माझे मन उत्साही आणि आनंदी होते.
२. सौ. आशा बाळासाहेब निकम, बीड
अ. ‘ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने आलेला अनुभव हा अत्यंत आनंदाचा आहे.
आ. मला घरी विरोध असूनही मी बाहेर पडू शकले. मी प्रवासाला निघण्यापासून ते परतीच्या प्रवासापर्यंत सगळे कसे आश्चर्यकारकच घडत होते.
इ. आम्ही सर्व साधक किती जन्मांचे पुण्य समवेत घेऊन आलो आहोत; म्हणून ब्रह्मोत्सव सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित रहाता आले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासह अनेक संतांचे दर्शन झाले.
ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून मला पुष्कळ चैतन्य अनुभवता आले.
उ. ‘प.पू. गुरुदेवांच्या प्रत्यक्ष दर्शनाची आजही आठवण झाली, तरी माझी भावजागृती होते.’
३. श्री. विलास पुजारी (वय ६२ वर्षे), तुळजापूर
अ. ‘ब्रह्मोत्सवाचा भव्य-दिव्य सोहळा पाहून ही हिंदु राष्ट्राची पहाट आहे’, असे मला वाटले.
आ. ‘ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्याचे अत्यंत उत्तम नियोजन पाहून हिंदु राष्ट्रात असेच उत्तम नियोजन असेल’, असे मला जाणवले.
इ. या युगात भगवान विष्णूने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प.पू. गुरुदेवांच्या रूपाने अवतार घेतला असून ‘ते हिंदु राष्ट्र स्थापन करणारच’, असे मला वाटले.
ई. ‘प.पू. डॉक्टरांचे विष्णुरूप पाहून ‘ते किती महान आहेत’, याची मला जाणीव झाली.
उ. हा सोहळा पाहिल्यानंतर प.पू. डॉक्टर ‘सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या सर्व साधकांचे कल्याण तर करणारच आहेत; पण या विश्वातील सर्वांचे कल्याण करणार आहेत’, असे मला जाणवले.
ऊ. ‘भावी काळात प.पू. डॉक्टर सनातनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाचे नेतृत्व करणार’, असे मला वाटले.
ए. ‘प.पू. डॉक्टर विश्वापेक्षा महान आहेत’, असे मला जाणवले.
‘प.पू. डॉक्टरांएवढे महान गुरु विश्वात दुसरे कुठेही नाहीत. माझे प्रारब्ध अतिशय तीव्र असतांनाही प.पू. डॉक्टरांनी मला फुलासारखे ठेवले. आता माझे उरलेले जीवन ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणी अर्पण करावे; कारण माझ्या प्रत्येक श्वासावर केवळ प.पू. डॉक्टर यांचा अधिकार आहे’, असे मला वाटते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २८.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |